...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:00 PM2024-10-31T13:00:32+5:302024-10-31T13:01:28+5:30
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात येण्यामागचं नेमकं कारण दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे
शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली झालेल्या बंडानंतर सोबत आलेल्या जवळपास सर्वच आमदारांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मात्र पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या श्रीनिवास वनगा यांना माध्यमांसमोर अश्रू अनावर झाले होते. तसेच उमेदवारी नाकारण्यात आल्याने श्रीनिवास वनगा हे मागच्या दोन अडीच दिवसांपासून नॉट रिचेबल होते. दरम्यान, श्रीनिवास वनगा यांना शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात येण्यामागचं नेमकं कारण दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.
श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देण्याच्या शिंदे गटाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर यांनी सांगितले की, श्रीनिवास वनगा यांची जागा धोक्यात असल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही. ज्या ज्या लोकांना काही कारणामुळे मुख्यमंत्री उमेदवारी देऊ शकले नाहीत त्यामध्ये भावना गवळी यांचाही समावेश होता. त्या चारवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर अन्याय झाला होता. मात्र नंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेचं आमदार केलं. तसंच श्रीनिवास वनगा यांनाही करणार. आमचे मुख्यमंत्री कुणावरही अन्याय करत नाहीत. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असं श्रीनिवास वनगा यांनी वाटून घेऊ नये. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी. १०० टक्के पुढच्या विधान परिषद आमदारांच्या यादीत त्यांचं नाव असेल, असे दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा हे अद्यापही संपर्काबाहेरच आहेत. काल पहाटे ते घरी आले होते. मात्र कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले होते. दरम्यान, ते आता घरी परतले असून, मला आता आरामाची गरज आहे, असं त्यांनी सांगितल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.