भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:11 AM2024-11-14T11:11:44+5:302024-11-14T11:12:44+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. त्यामुळे सभेस्थळी एकच चर्चा सुरु झाली.
सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. दरम्यान, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही सोलापूरात प्रचार सभा घेतली. यावेळी असदुद्दीन ओवैसी यांची सभा सुरू असतानाच, स्टेजवरच पोलिसांनी त्यांना नोटीस दिली. त्यामुळे सभेस्थळी एकच चर्चा सुरु झाली.
बुधवारी (दि.१३) सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला खासदार असदुद्दीन ओवैसी आले होते. त्यावेळी इतरांचे भाषण सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी त्यांना स्टेजवरच नोटीस दिली. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, अशी प्रक्षोभक भाषा वापरू करू नये अशी नोटीस पोलिसांनी दिली. भारतीय नागरिक संहिता कलम १६८ प्रमाणे पोलिसांनी ही नोटीस दिल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या नोटिशीतील चुका वाचून दाखवल्या
जेलरोड पोलिसांनी ओवैसींना प्रक्षोभक भाषण करू नये, अशी नोटीस दिली. ही नोटीस मराठीत होती. मला मराठी कळत नाही. इंग्रजी भाषेत नोटीस द्या. वाचून सही करतो, असे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. यातून पोलिसांची पळापळ झाली. यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी इंग्रजीतून आलेली नोटीस जाहीरपणे वाचताना त्यातील चुकाही वाचून दाखवल्या.
महागाईच्या विषयाबद्दल बोला - असदुद्दीन ओवैसी
महायुती सरकारने एका हाताने लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले. दुसरीकडे महिलांवर महागाई लादून १९०० रुपये काढून घेतले, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली. तसेच, असदुद्दीन ओवैसी यांनी लाडकी बहीण योजना लागू होण्यापूर्वी आणि पैसे दिल्यानंतर झालेली किराणा मालाची दरवाढ वाचून दाखवली. महागाईने या राज्याला बरबाद केले, असे सांगत ते म्हणाले, तुम्ही निवडणुकांकडे हिंदू मुस्लिमांची लढाई म्हणून बघू नका. महागाईच्या विषयाबद्दल बोला. भाजप नेत्यांनी सोलापुरातून लष्कराचे युनिफॉर्म तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले.
जरांगे-पाटलांनी तुमची झोप उडवली - असदुद्दीन ओवैसी
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द भाजपने दिला होता. आता तो शब्द न पाळल्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन सुरू केले. जरांगे-पाटलांनी तुमची झोप उडवली आहे. तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
मग बी टीम कोण याचा विचार करा : शाब्दी
फारुख शाब्दी म्हणाले, महायुती सरकारच्या काळात लोकांची घरे तोडण्याचे काम सुरू आहे. संविधान, लोकशाहीला संकटात आणण्याचे काम सुरू आहे. एमआयएम भाजपची बी टीम असल्याची टीका काँग्रेसवाले करतात. आम्ही बी टीम असतो तर लोकसभेला सोलापुरात उमेदवार देऊन काँग्रेसला पराभूत केले असते. पण भाजपला रोखण्यासाठी आम्ही उमेदवार दिला नाही. काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपमध्ये गेले. मग बी टीम कोण आहे याचा विचार करा.