"वडिलांची तब्येत खराब असली तर पहिला फोन राज ठाकरेंचा येतो"; सुप्रिया सुळेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 07:00 PM2024-11-08T19:00:07+5:302024-11-08T19:06:59+5:30
राज ठाकरेंचे शरद पवारांबाबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांबाबत सुप्रिया सुळेंनी खुलासा केला आहे.
Supriya Sule : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर जोरदार टीका आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यामध्ये मागे नाही. मनसेने यावेळी विधानसभा निवडणूक स्वबाळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रभर सभा घेत आहे. या सभांमधून राज ठाकरे महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. विशेषतः शरद पवार यांच्यावर उघडपणे अनेकदा टीका केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीचं विष कालवल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. मात्र आता राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.
आठवड्याभरापूर्वी जातीवाद पसरवत शरद पवार यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याआधीही विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण झाले. या सर्व गोष्टींना शरद पवार कारणीभूत आहेत. त्यांनी ही सुरुवात केली. जातीचे विषही शरद पवार यांनीच कालवले, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. मात्र या पलीकडेही राज ठाकरे यांच्या कुटुंबांसोबत पवार कुटुंबियांसोबत असलेल्या नात्याबाबत सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे.
झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी माहीम मध्ये उद्धव ठाकरेंनी उमेदवार द्यायला हवा होता का या प्रश्नाला उत्तर देताना प्रतिक्रिया दिली. "यामध्ये माझा संबंध नाही. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आमच्यासोबत फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझं लग्न ठरवण्यात सगळ्यात मोठा पुढाकार बाळासाहेब आणि मीनाताईंनी घेतला होता. हे मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या सासर्यांची आणि बाळासाहेबांची फार जवळची मैत्री होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी कौटुंबिक संबंध आजही पाळले आहेत. राज ठाकरेंच्या घरात लग्न होतं तेव्हा आम्ही आवर्जून गेलो होतो. माझ्या वडिलांची तब्येत खराब असल्याची बातमी आली तर पहिला फोन राज ठाकरेंचा येतो. हे मी आयुष्यभर विसरणार नाही. राजकारण चालत राहील. पण वैयक्तिक संबंध सगळ्याच ठाकरे कुटुंबीयांनी जपले आहेत," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
"मला बाळासाहेब खूप प्रिय होते मी आणि सदानंद आम्ही दोघेही बाळासाहेबांना भेटायला जायचो. तू नात्यातला ओलावा त्या पिढीने जपला आणि तो पुढेही न्यायचा प्रयत्न आमच्या पिढीत दोन्ही बाजू कडून होत आहेत," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.