घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
By यदू जोशी | Published: October 19, 2024 11:24 AM2024-10-19T11:24:43+5:302024-10-19T11:26:16+5:30
२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती. या ३७ मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत.
यदु जोशी -
मुंबई : विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत ३७ विधानसभा मतदारसंघांतील विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे पाच हजारहून कमी होते. यावेळी हे मतदारसंघ कोणाला साथ देतात हे महत्त्वाचे असेल. घासून आलेल्या जागांवरील निकाल एकूणच जय-पराजयासाठी निर्णायक ठरतील.
२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती. या ३७ मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत. गेल्यावेळी आमने-सामने असलेले दोघेही आज महायुतीत किंवा महाविकास आघाडीत आहेत. युती वा आघाडीला बंडखोरीचा फटका कमी मताधिक्याने निकाल दिलेल्या मतदारसंघात बसू शकतो. कमी फरकाने जिंकलेले आणि हरलेले दोघेही महायुतीत वा महाविकास आघाडीत आहेत, अशा ठिकाणी बंडखोरीची शक्यता अधिक असेल.
५ उमेदवार एक हजारापेक्षाही कमी मतांनी झाले होते विजयी
४ उमेदवारांना मिळाले होते एक ते दोन हजार दरम्यानचे मताधिक्य
१२ उमेदवारांचे मताधिक्य होते दोन हजार ते तीन हजार दरम्यान
८ उमेदवारांचे मताधिक्य होते तीन हजार ते चार हजार दरम्यान
८ उमेदवारांनी चार ते पाच हजार दरम्यानचे मताधिक्य घेत गाठली होती विधानसभा
समीकरणे बदलली, चुरस वाढली
सर्वात कमी मतांनी जिंकलेले शिवसेनेचे दिलीप लांडे आता शिंदेसेनेत आहेत. आता तेच शिंदेसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार असतील असे चित्र आहे. गेल्यावेळी त्यांच्याकडून पराभूत झालेले माजी मंत्री नसीम खान (काँग्रेस) हे आता उद्धवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली तर उद्धवसेना त्यांच्या प्रचारात उतरेल.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमध्ये मोठा पेच आहे. गेल्यावेळी तिथे भाजपचे राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी ७१८ मतांनी पराभव केला होता. चंद्रिकापुरे आता अजित पवार गटात आहेत आणि ते महायुतीचा भाग आहेत. त्यामुळे उमेदवारीवरून तिथे नाराजीनाट्य रंगू शकते.
कोपरगावमध्ये जिंकलेले राष्ट्रवादीचे आशुतोष काळे (आता अजित पवार गट) आणि पराभूत झालेल्या स्नेहलता कोल्हे (भाजप) हे दोघेही आता महायुतीचा भाग आहेत. तिथेही संघर्षाची चिन्हे आहेत.
माळशिरसमध्ये गेल्यावेळी भाजपचे राम सातपुते केवळ २,५९० मतांनी जिंकले होते. त्यावेळी मोहिते पाटील घराणे त्यांच्या पाठीशी होते. आता हे घराणे भाजपच्या विरोधात आणि शरद पवार यांच्यासोबत आहे.