महायुतीमधील जागावाटपाचा तिढा वाढणार, आता महादेव जानकर यांनी केली ५० जागांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 03:37 PM2024-07-29T15:37:37+5:302024-07-29T15:38:11+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीमधील छोट्या पण प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने ५० जागांची मागणी केली आहे. महादेव जानकर यांच्या या मागणीमुळे आधीच जागावाटपावरून पेचप्रसंग निर्माण झालेल्या महायुतीमधील तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यात सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी अधिकाधिक जागांची मागणी करत महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाचं टेन्शन वाढवलं आहेत. त्यात आता महायुतीमधील छोट्या पण प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने ५० जागांची मागणी केली आहे. महादेव जानकर यांच्या या मागणीमुळे आधीच जागावाटपावरून पेचप्रसंग निर्माण झालेल्या महायुतीमधील तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी सांगितलं की, आमच्याकडून विधानसभेच्या २८८ जागांवर तयारी सुरू आहे. कुठल्याही पक्षासोबत आपण युती करतो, तेव्हा विद्यमान आमदाराला पर्याय आपल्याला तयार ठेवावा लागतो. त्या दृष्टीने आम्ही २८८ जागांवर तयारी करत आहोत. काही ठिकाणी त्याचा आमच्या मित्र पक्षांना फायदा होईल. तर काही ठिकाणी मित्रपक्षांचा आम्हाला फायदा होईल. त्यादृष्टीने आम्ही राज्यातील २८८ विधानसभा आणि विदर्भातील ६२ मतदारसंघात मेळावे घेत आहोत. तसेच २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा २०वा वर्धापन दिन हा अकोला येथे ठेवण्यात आला आहे. या मेळाव्याला ५० हजार लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. आहे.
यावेळी महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्षाला अपेक्षित असलेल्या जागांबाबत महादेव जानकर यांनी सांगितले की, महायुतीमधून आम्हाला किमान ५० जागा मिळाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे. महायुतीमधील नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून आम्हाला ५० जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे, असेही महादेव जानकर म्हणाले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा देण्यात आली होती. परभणी लोकसभा मतदारसंघातील त्या जागेवरून स्वत: महादेव जानकर लढले होते. मात्र त्यांना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.