"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:51 PM2024-11-19T15:51:34+5:302024-11-19T15:52:47+5:30
Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या कथित पैसै वापट प्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस विकला जाणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी वसई विरार येथे कथितपणे पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या कथित पैसेवाटप प्रकरणावरून आता विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी माणूस विकला जाणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
याबाबत सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले गेले आहेत. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही. ही जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची जनता आहे, असे जयंत पाटील यांनी भाजपाला सुनावले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगे हात पकडले गेले आहे. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 19, 2024
मात्र… pic.twitter.com/U0Z1y6Czq3
दरम्यान, विनोद तावडे यांनी पैसे वाटपाचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितले की, बविआ आमचा मित्र पक्ष आहे, ते म्हणतायत की मी पैसे वाटत होतो. हे ठाकूर मला ओळखतात मी ४० वर्षे पक्षाचे काम करतो. वाड्याहून परतत असताना नालासोपाऱ्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या पक्षाचा असा समज झाला की मी पैसे वाटायला आलो. सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही असे मी म्हटले, असे तावडे म्हणाले.