पहिल्या यादीत नाव नाही, पक्षाला रामराम ठोकत भाजपाचा हा नेता थेट जरांगेंच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:07 PM2024-10-21T14:07:55+5:302024-10-21T14:08:56+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नाराज झालेले बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते राजेंद्र म्हस्के यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच राजेंद्र म्हस्के (Rajendra Mhake) यांनी आज थेट मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमधून अनेक विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र काही इच्छुकांची निराशा झाली असून, त्यांची नाराजी आता समोर येत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने नाराज झालेले बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते राजेंद्र म्हस्के यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच राजेंद्र म्हस्के यांनी आज थेट मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणारे राजेंद्र म्हस्के हे बीडमधून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र काल जाहीर झालेल्या उमेदवारांचा पहिल्या यादीत त्यांचं नाव आलं नव्हतं. त्यामुळे नाराज झालेल्या राजेंद्र म्हस्के यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज राजेंद्र म्हस्के यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत पुढील वाटचालीबाबत संकेत दिले आहेत.
भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर
— Rajendra Maske (@Maske__Rajendra) October 21, 2024
आज प्रथमच अंतरवली सराटी येथे मराठा संघर्षयोद्धा मा.मनोजदादा जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/HJ639uUcuV
दरम्यान, काल भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा करताना राजेंद्र म्हस्के म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत यंत्रणा उभी केली. विजयासाठी कष्ट घेतले. दुर्दैवाने पराभवानंतर व्यक्त केलेली शंका मनाला वेदना देणारी आहे. पराभवाचे खापर एकट्या मराठा समाजावर फोडून मोकळे झाले. मागील वर्षी बैलगाडा शर्यती दरम्यान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या साक्षीने पंकजाताईंनी विधानसभेची उमेदवारी देण्याचे संकेत दिले. परंतु, आज विधानसभा रणधुमाळी चालू असताना पक्षाने विचारपूस केली नाही. यावरून स्पष्ट येते की, भारतीय जनता पार्टीला राजकीय नकाशावर बीड जिल्ह्याची गरज उरलेली नाही. सर्व बळ आणि ताकत विरोधकांना देण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाने घेतला आहे. जिह्यातील पक्ष हितासाठी प्राधान्य दिले गेले नाही. अशा नेतृत्वात काम करणे दुरापस्त आहे. म्हणून आज जिल्हाध्यक्ष पदासह भारतीय जनता पार्टीचा त्याग करत आहे. आगामी दोन तीन दिवसात योग्य तो राजकीय निर्णय घेतला जाईल, असं विधानही त्यांनी केलं होतं.