"आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 01:10 PM2024-11-21T13:10:10+5:302024-11-21T13:11:58+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली. आता विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोल समोर आले आहेत. अनेक एक्झिट पोलमध्ये महायुती वरचढ दिसत आहे. तर, काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एक मोठा दावा केला आहे. राज्यात आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
यासंदर्भात बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,"माझ्या अचलपूर मतदारसंघात भाजपनं खालच्या पातळीवर प्रचार केला. काँग्रेस आणि भाजप दोघेही अचलपूर मतदारसंघात संभ्रमात होते. काँग्रेसवाल्यांनी काही ठिकाणी भाजपला आणि भाजपनं काही ठिकाणी काँग्रेसला मतदान करण्यास सांगितलं. दोघेही एकमेकांशी लढत राहिले. दोघांच्या डोक्यात फक्त बच्चू कडूला पाडणं होतं. निवडून येणे हा त्यांचा विषयच नव्हता. मात्र, आमचा विजय निश्चित आहे".
पुढे बच्चू कडू म्हणाले, "आमच्या प्रहारचे किमान १० आमदार निवडून येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून १५ आमदार होतील. कुणाचीही सत्ता येईल, अशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत. हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. लहान पक्ष आणि अपक्ष, असं गठबंधन झाल्यानंतर मग सत्तेचं स्वरूप आणि दिशा बदलेल."
याचबरोबर, "संपूर्ण सत्ता अपक्ष आणि लहान पक्षाकडे राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा, हे मोठे पक्ष ठरविणार नाहीत. आम्ही कोणाला सोबत घ्यायचं ते आता आम्ही ठरवणार आहे. राज्यातील सरकार अपक्ष आणि लहान पक्ष चालवणार आहे. सरकार आमचं असेल. मोठे पक्ष पाठिंबा देतील. आता मोठ्या पक्षासाठी आमचा फोन नॉट रीचेबल राहील," असेही बच्चू कडू यांनी सांगितले.