"ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा सुव्यवस्थेबाबत सांगताहेत’’, देवेंद्र फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 01:25 PM2024-10-16T13:25:19+5:302024-10-16T13:25:39+5:30
Maharashtra Assembly Election 2024: मागच्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत.
मागच्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच ’ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा सुव्यवस्थेबाबत सांगताहेत, असा टोला त्यांनी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला लगावला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधकांकडून निर्माण करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलत असताना आधी आरशात पाहिलं पाहिजे. कारण, मी आता गुन्ह्यांच्या संख्येमध्ये येणार नाही, पण तिही आकडेवारी माझ्याकडे आहे. पण आकडेवारीमधून गुन्ह्यांचं वर्णन करणं योग्य नसतं. पण ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला. ते आता आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था सांगताहेत. ज्यांच्या काळात कॅश फॉर ट्रान्सफरसारखे घोटाळे झाले, याचं सगळं रेकॉर्डिंग झालंय. ज्याची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. आता त्या सरकारमधील मंडळी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सांगतेय, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर ज्यांचे पोलीस बॉम्ब ठेवत होते. ते उघडकीस येऊ नये म्हणून पोलिसांनीच हत्या केली. ते आता आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी सांगत आहेत. कोरोनाच्या काळात ज्यांनी पत्रकारांना घरामधून ओढून तुरुंगात टाकलं. ते आता आम्हाला कायदा, सुव्यवस्था आणि देशाची लोकशाही कशी राहिली पाहिजे, याबाबत सांगत आहे. एवढंच नाही तर कोरोनाच्या काळात आरोपींना प्रवास करण्यासाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या, ते आता कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.