तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 08:47 AM2024-10-27T08:47:58+5:302024-10-27T08:48:51+5:30

Maharashtra Assembly Election 2024 :  डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघातून भाजपतर्फे, राजेंद्रकुमार गावित हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आणि  नवापूर मतदारसंघातून  शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. 

Maharashtra Assembly Election 2024 : Three brothers in the election fray for the second time; Vijay Kumar from Nandurbara, Rajendra Kumar from Shahada, Sharad Gavit from Navapur  | तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

Maharashtra Assembly Election 2024 : नंदुरबार : एकाच जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून तीन सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहेत, असा आगळावेगळा विक्रम नंदुरबार जिल्ह्यात घडत आहे आणि पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा हे तीन भाऊ रिंगणात आहेत. गावित कुटुंबाचे सदस्य असलेले हे भावंड म्हणजे डॉ. विजयकुमार गावित, राजेंद्रकुमार गावित आणि शरद गावित. डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबार मतदारसंघातून भाजपतर्फे, राजेंद्रकुमार गावित हे शहादा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आणि  नवापूर मतदारसंघातून  शरद गावित हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. 

सहा निवडणुकांमध्ये विजय, सातव्यांदा रिंगणात
नंदुरबारच्या राजकारणात विजयकुमार गावित यांच्या परिवाराचे वर्चस्व आहे. स्वत: डॉ. विजयकुमार गावित हे सहा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. यंदा ते सातव्यांदा रिंगणात आहेत. काही अपवाद वगळता ते १९९५ पासून सातत्याने राज्य मंत्रिमंडळात आहेत.
त्यांच्या कन्या डॉ. हीना गावित या  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत  निवडून आल्या होत्या. २०२४ च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. डॉ. गावित यांनी आधी अपक्ष, नंतर तीन टर्म राष्ट्रवादी व दोन टर्म भाजपकडून उमेदवारी केली आहे. आता देखील ते भाजपचे उमेदवार आहेत.

गेल्या काही निवडणुकांचे चित्र
वर्ष २००९ मध्ये त्यांचे लहान बंधू शरद गावित यांनी नवापूर मतदारसंघातून विजय मिळविला होता. समाजवादी पक्षातर्फे त्यांनी उमेदवारी करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव केला होता. नंतर ते २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवार राहिले; परंतु त्यांना यश मिळू शकले नाही. यंदाही ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शहाद्यातून दुसऱ्यांदा...
 राजेंद्रकुमार गावित हे देखील दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शहादा मतदारसंघात यापूर्वी त्यांनी नशीब आजमावले आहे; परंतु यश मिळाले नाही. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी शहादा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली होती; परंतु त्यांना यश मिळू शकले नव्हते. आताच्या निवडणुकीत त्यांनी शहादा मतदारसंघात काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळविली आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Three brothers in the election fray for the second time; Vijay Kumar from Nandurbara, Rajendra Kumar from Shahada, Sharad Gavit from Navapur 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.