तीन योगेश कदम, तीन संजय कदम, दापोलीत सहा कदम रिंगणात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:11 AM2024-11-05T06:11:36+5:302024-11-05T06:12:29+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडी आणि महायुतीने नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. दापोली मतदारसंघात तब्बल तीन संजय कदम आणि तीन योगेश कदम रिंगणात उतरले आहेत.
रत्नागिरी - महाविकास आघाडी आणि महायुतीने नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. दापोली मतदारसंघात तब्बल तीन संजय कदम आणि तीन योगेश कदम रिंगणात उतरले आहेत. त्याशिवाय चिपळूण मतदारसंघात दोन शेखर निकम आणि दोन प्रशांत यादव निवडणूक लढवत आहेत. महत्त्वाचे म्हणजे नामसाधर्म्य असणारे सर्व अर्ज शेवटच्या दिवशीच दाखल झाले.
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्याच्या नावासारखे नाव असलेला दुसरा उमेदवार उभा करण्याची पद्धत गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये रायगड मतदारसंघात वापरण्यात आली होती. या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातही यावेळी हाच प्रकार करण्यात आला आहे.
दापोलीमध्ये उद्धवसेनेकडून संजय कदम आणि शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार योगेश कदम रिंगणात आहेत. येथे संजय कदम नावाच्या दोन आणि योगेश कदम नावाच्या दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
चिपळूणमध्ये दोन निकम आणि दोन यादव
दापोली प्रमाणेच चिपळूण मतदारसंघातही सारख्याच नावाचे उमेदवार आहेत. येथे शेखर निकम (अजित पवार गट) आणि प्रशांत यादव (शरद पवार गट) उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेखर निकम (अपक्ष) आणि प्रशांत यादव (अपक्ष) असे अर्ज दाखल झाले आहेत.