भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 02:35 PM2024-11-15T14:35:43+5:302024-11-15T14:43:51+5:30

सिल्लोड मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत महायुतीचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध घणाघात केला.

Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray appealed to BJP workers against Shivsena Eknath Shinde Candidate Abdul Sattar | भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

सिल्लोड - तुमचे आमचे मतभेद असतील. त्याच्यासाठी माझ्याशी कुणी बोलायला तयार असेल तर मीही बोलायला तयार आहे. पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकू. ही संधी आहे अशी साद उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना घातली आहे. सिल्लोड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळे गद्दार एकत्र झालेत. मंत्रिपद देऊनसुद्धा यांची भूक शमत नाही. सगळे हावरटासारखे खात सुटलेत. सत्तेचा दुरुपयोग करून तुम्ही गोरगरीबांना छळणार असाल तर तुम्हाला कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही हे सिल्लोडकरांना सांगण्यासाठी मी इथं आलोय. गेल्यावेळी माझी चूक झाली हे प्रामाणिकपणे कबुल करतो, त्याबद्दल तुमची माफी मागतो. आम्हाला वाटलं समोर लोक येतात, तेव्हा मस्ती दाखवू शकत नाही. तुमचं स्वप्न साकार करेन असं बोलले, माझं स्वप्न राहू द्या तुम्ही गोरगरीबांची झोप उडवली. तुम्ही मालमत्ता वाढवून ठेवलीय असा घणाघात ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्यावर केला. 

तसेच यापुढे हे होता कामा नये. आज इथं सगळे एकवटलेत, सर्व एकटवल्यानंतर समोर कितीही मोठा माणूस असू दे तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा या देशाचा इतिहास आहे. मी भाजपाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतोय ही संधी सोडू नका. पुन्हा सिल्लोडमध्ये गुंडगिरी, दहशतीचं राज्य भाजपा कार्यकर्त्यांना हवंय असं वाटत नाही. जो सच्चा भाजपा कार्यकर्ता आहे तो या गुंडागिरीविरुद्ध, यांचा दहशत मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. आपली संस्कृती आणि आपले संस्कार वेगळे आहेत, मी भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन करतोय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

दरम्यान, मी भगवा झेंडा घेऊन महाराष्ट्रात फिरतोय, आज माझ्यासमोर मुस्लीम भगिनी बसल्यात. त्यांना भीती का वाटत नाही, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्व सोडलं नाही तरीही एवढ्या गर्दी माझ्या मुस्लिम भगिनी सभेला येऊन बसतात, त्यांना इथे भीती वाटत नाही बिनधास्त बसतात. उलट त्यांच्यापासून भीती वाटते. हेच तर आमचे हिंदुत्व आहे. मोदींच्या सभेला मुस्लीम महिलांना मैदानात जावू दिले नाही. कारण आम्ही काळे कपडे घातलेत. तुमच्यात माणुसकी शिल्लक आहे की नाही. म्हणून मी मनापासून भाजपा कार्यकर्त्यांना तळमळीने सांगतोय ही संधी सोडू नका असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

ठाकरेंच्या विधानावर भाजपा नेते दानवे काय म्हणाले?

आमच्यापुढे २ प्रश्न आहेत, हरवायचं कुणाला, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला साद घालतोय. उद्धव ठाकरेंना हटवण्यासाठी आम्हाला साद द्या मात्र त्यांनी आम्हाला साद घातली अब्दुल सत्तार यांना हटवायला साथ द्या. हा पक्षातंर्गत प्रश्न आहे. या विषयावर मी फारसं भाष्य करणार नाही. मी भाजपाचा राज्यातील प्रमुख आहे. एका जागेचा विचार करत नाही. महायुती एकत्रित विचार करतोय. सगळ्यांचा विचार केला तर आम्हाला उद्धव ठाकरे-शरद पवार आणि काँग्रेस यांना हटवायचे आहे. माझा आणि उद्धव ठाकरेंचा या निवडणुकीत काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.   

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray appealed to BJP workers against Shivsena Eknath Shinde Candidate Abdul Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.