"गुंडागर्दी बस, सांगून ठेवतो तुझा हात..."; उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांना जाहीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:19 PM2024-11-11T23:19:01+5:302024-11-11T23:22:43+5:30
Uddhav Thackeray on Dhananjay Mahadik : खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेची विधानसभा निवडणुकीत जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार या निवडणुकीमध्ये होत आहे. मात्र या योजनेवरुन भाजप खासदाराने केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केलं. १५०० रुपये घेतलेल्या महिल्या काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या असं धनंजय महाडिकांनी म्हटलं.यावरुनच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडिकांना इशारा दिला आहे.
चोपडा येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानावरुन जोरदार टीका केली. लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं होतं. धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. महिलांना पंधराशे रुपये देऊन त्यांच्यावर उपकार करताय का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
"महिलांना जे काही पंधराशे रुपये दिले जातात जणू काही त्यांच्यावर उपकार करत आहेत. कोल्हापूरचे मुन्ना महाडिक मस्ती मध्ये बोलले की ज्या महिला महाविकास आघाडीच्या सर्वांना जातात त्यांचे फोटो काढून पाठवा. तू काय करणार आहेस. माझ्या एका जरी बहिणीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना महाडिकला सांगून ठेवतो तुझा हात उखडून ठेवेल. ही गुंडागर्दी बस झाली. इथल्या सुद्धा गद्दाराला सांगतोय राहायचं तर सरळ नाही तर वाकडा करून पाठवेल," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक आणि गुलाबराव पाटील यांना दिला.
काय म्हणाले धनंजय महाडिक?
"लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या. त्यांची नावे लिहून ठेवा.आपल्या शासनाचे घ्यायचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. त्यांचे फोटो आमच्याकडे द्या. त्यांची व्यवस्था करतो. कोण जास्त बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे. आम्ही पैसे लगेच बंद करतो," असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं होतं.