माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 07:33 PM2024-11-17T19:33:27+5:302024-11-17T19:34:42+5:30
आपल्यात गद्दारी करणाऱ्यांना मत देऊ नका. मी असे कुठे केले नाही. महाविकास आघाडीचा उमेदवाराविरोधात मी कुणाला मदत करणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
पाटण - गद्दारांनी आधी माझ्या वडिलांचे फोटो वापरायचे सोडा, तुमच्यात हिंमत असेल स्वत:च्या वडिलांचे फोटो लावा आणि मत मागायला ये मग कसे झोडे खातात ते बघा. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले हे बरोबर आहे. मग मी भाजपाची कमळाबाई होऊ देईन असं ते म्हणाले का? कमळाबाईही होऊ देणार नाही. तुम्हाला आनंद पाहिजे की छळवणूक पाहिजे हे ठरवा मग ज्याला मत द्यायचे त्याला द्या असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पाटण येथील भाषणात एकनाथ शिंदेंसह शंभुराज देसाई यांच्यावर घणाघात केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गद्दारी खूप झाली, जी काही ते कारणे सांगतायेत, कोण म्हणतं उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत गेली म्हणून आम्ही गद्दारी केली, मग इथे जे लूटमार मंत्री आहेत, पालकच खायला लागले तर ते लूटमार मंत्रीच आहेत. तुमचे आजोबा काँग्रेसमधूनच मंत्री होते तेव्हा काँग्रेसचं काय झाले हे दिसले नव्हते का? काँग्रेसमध्ये कुणी विचारेना म्हणून आपल्या कळपात घुसले, आपल्याला दया आली. बाळासाहेब देसाई आणि बाळासाहेब ठाकरेंचे ऋणानुबंध होते म्हणून घेतले. परंतु आपल्याला काही माहिती हा लूटमार करणारा करंटा असेल. आपण मंत्री केला, जी गद्दारी झाली हाच लांडगा पुढे होता. दुसरा महेश शिंदे, ही सगळी माणसे शिवसेना म्हणजे गांडुळांची औलाद आहे...जो करेल मंत्री त्याचा मी होणार वाजंत्री... वाजंत्र्याचे काम करत बस. पाटणमध्ये ३ उमेदवार आहेत, एक लूटमार मंत्री, सत्ता आल्यानंतर ही सगळी प्रकरणे कशी मार्गी लावतो बघा, दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्ध्याचा आव आणणारे निवडणुकीत जागे झालेत असं त्यांनी सांगितले.
तसेच आजपर्यंत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाने केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी आपल्या डोक्यावर घेतली होती. ही डोक्यावरची ओझी उतरवा, माझी माणसं विधानसभेत पाठवा. तयारी खूप छान आहे, लोकांचा प्रतिसाद जोरात आहे पण पैसे दिले जातील, लुटीचे पैसे आता तुम्हाला वाटून पुढची तयारी करतायेत. केलीय लुट भारी, आता पुढची तयारी असे होर्डिंग्स लागलेत. संपूर्ण महाराष्ट्र गुजरात अदानींच्या चरणी वाहून टाकायचा. त्यांच्या हातात पुन्हा महाराष्ट्र देणार का? निवडणुकीतील हार पराजय समजून घ्या, पण इथं कुणीतरी नाही अख्खा महाराष्ट्र लढतोय. हरलो तर अख्खा महाराष्ट्र हरेल. कोणाला जिंकवायचे तुम्ही ठरवणार आहोत. सगळं काही ओरबाडून नेतायेत. त्यांच्याकडून जे येईल ते घ्यायचे एवढेच काम सुरू आहे. दुर्दैवाने हे लोक पुन्हा निवडून आले तर ताठ होतील. आता पाया पडतील, नंतर ओळखत नाहीत. ज्या ज्या वेळी तुमच्यासमोर येतील तेव्हा विचारा माझ्या मुलाला नोकरी का नाही, शिक्षण का मिळत नाही. उद्योगधंदे पाटणमध्ये का आणले नाहीत. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली सगळे दिले, मी तर शंभुराजला गृहमंत्री दिले, पोलीस खाते वापरले, गद्दारांना ढोकळा खायला मदत केली. तुम्ही गुजरातला जावून निवडणूक लढवा इथं काय करताय असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
दरम्यान, प्रियंका गांधी शिर्डीत आल्या त्या बाळासाहेबांबद्दल चांगले बोलल्या आणि भाजपाचे दात त्यांच्याच घशात घातले. तोडा, फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती, मोदी-शाह यांना महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून यांनी पहिला घाव शिवसेनेवर घातला कारण शिवसेना ही हिंदूहृदयसम्राटांनी महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. आता माझी सटकली, आता तुझी वेळ आली असेच सांगायचे. भाजपाने आधीच १६० उमेदवार उभे केलेत. इथं काँग्रेस राष्ट्रवादीची लोक आलेत त्यांना धन्यवाद देतोय आपल्यात गद्दारी करणाऱ्यांना मत देऊ नका. मी असे कुठे केले नाही. महाविकास आघाडीचा उमेदवाराविरोधात मी कुणाला मदत करणार नाही. ज्याच्या रक्तात गद्दारी असेल तर तो अपक्षाला मदत करेल असं सांगत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील बंडखोरांनाही फटकारलं.