अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:04 PM2024-11-12T18:04:54+5:302024-11-12T18:07:22+5:30

महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करतायेत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. कधी बिनशर्ट, कधी इनशर्ट पाठिंबा देतायेत त्यांच्यावर मी काय बोलणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray criticizes MNS Raj Thackeray, Amit Thackeray has no support in Mahim Constituency | अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं

अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं

मुंबई - जे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना पाठिंबा मी स्वप्नातही देणार नाही, विषय संपला अशा एका वाक्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंना फटकारलं आहे. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून त्यांना पाठिंबा मिळेल असं बोललं जात होते. परंतु आज उद्धव ठाकरे यांनी त्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. कोरोना काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी मी घेतली. आज ते कुटुंब लुटलं जातंय त्या लुटारूंना अप्रत्यक्षपणे स्वप्नातही पाठिंबा देणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं त्यांनी जाहीर केलंय म्हणजे महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या लुटारूंना मी स्वप्नातही पाठिंबा देणार नाही आणि महाराष्ट्र प्रेमींनीही महाराष्ट्राच्या लुटारूंना पाठिंबा देऊ नये असं आवाहन करत राज ठाकरेंना नाव न घेता फटकारलं.  टीव्ही ९ नं घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

त्याशिवाय महायुती महाराष्ट्र लुटारू आहे. त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांना मदत करणारे हे महाराष्ट्र लुटायला मदत करतायेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी जेव्हा मी केले त्याचीसुद्धा या लोकांनी खिल्ली उडवली होती. त्याच कुटुंबाची मी जबाबदारी घेतली तर पोटात का दुखते? तेव्हा माझी खिल्ली उडवली होती. अगदी माझ्या आजारपणाचीही उडवली. मी ज्या अनुभवातून गेलो ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी ती परिस्थिती अनुभवून बघावी. माझी नक्कल केली. माझा पक्ष फोडला. त्यांना मदत करणाऱ्यांना मी मदत करू?. महाराष्ट्र लुटारूंना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणार नाही अथवा त्या लोकांना मदत करणाऱ्यांनाही मदत करणार नाही हे मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय असं उद्धव ठाकरे यांनी सांगत महायुतीसह मनसेवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, भाकड जनता पक्ष आहे. नरेंद्र मोदींना शिवसेनाप्रमुखांच्या नावाने जोगवा मागावा लागला. मोदींच्या नावावर मते मिळत नाही. भाजपाच्या ए, बी टीमशी मी बोलत नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करतायेत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. कधी बिनशर्ट, कधी इनशर्ट पाठिंबा देतायेत त्यांच्यावर मी काय बोलणार...महाराष्ट्र लुटारू विरोधातील मते फोडायची आणि महाराष्ट्र लुटारुंना मदत करायची हे ज्यांचे कार्य आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. डोळ्यादेखत सगळे उद्योग गुजरातला जात असतील तर अशांना लोकांना लोक मदत करणार नाहीत. स्वत:चं आयुष्य आणि पुढच्या पिढ्या बर्बाद करणाऱ्याला मत कोण देणार असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केला. 

महाराष्ट्राला गद्दारीचा कलंक लागला

महाराष्ट्र कधीही खोटं बोलणारा नाही. महाराष्ट्र पेटला आहे. गद्दारी करून महाराष्ट्राला बदनाम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला कलंक जनता पुसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातही या लोकांनी पैसा खाल्ला. मी मुख्यमंत्री असताना समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करणं याला मंजुरी दिली होती. परंतु आजपर्यंत त्याचे काम सुरू झाले नाही. कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात. मुंबईतल्या रस्त्याचे काम झाले नाही. कोस्टल रोडचं स्वप्न आम्ही दाखवले. मुंबई महापालिकेच्या पैशातून ते पूर्ण झालं आहे. मुंबई महापालिकेतील वचननामा होता. त्याचे श्रेय आता हे घेतायेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी महायुतीला लगावला. 

लुटना और बाटना ही भाजपाची नीती 

भाजपाने शब्द पाळला नाही हे सुदैवाने बरे झाले नाहीतर भाजपाचा खोटेपणा आम्हाला कळला नसता. आता शिंदेंना त्यांनी घेतले. अमित शाहांनी सांगितले देवेंद्र फडणवीस सरकार येणार मग हे भांडी घासणार का? मुंबईची तिजोरी खाली केली गेली. प्रत्येक राज्याला कर्ज घेण्याची एक मुभा असते ती मुभा डिसेंबरची आता वापरली. नियोजनशून्य विकास सुरू आहे जो कंत्राटदारांसाठी आहे. कोट्यवधीचा पैसा गेला कुठे, कंत्राटदार लाडके आहेत. बटेंगे तो कटेंगे नही तर लुटना और बाटना हे भाजपाचं धोरण आहे. महाराष्ट्र लुटायचा आणि मित्रांना वाटायचा अशी टीकाही ठाकरेंनी भाजपावर केली.

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Uddhav Thackeray criticizes MNS Raj Thackeray, Amit Thackeray has no support in Mahim Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.