"एक हैं तो सेफ हैं "; PM मोदींच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्हाला काय शिकवता आम्ही सगळे एकत्र"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 06:34 PM2024-11-08T18:34:05+5:302024-11-08T18:35:49+5:30

एक हैं तो सेफ हैं या घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi for his slogan Ek Hain To Seif Hain | "एक हैं तो सेफ हैं "; PM मोदींच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्हाला काय शिकवता आम्ही सगळे एकत्र"

"एक हैं तो सेफ हैं "; PM मोदींच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "आम्हाला काय शिकवता आम्ही सगळे एकत्र"

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगेची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातल्या सभेतून एक हैं तो सेफ हैं ची घोषणा दिली. काँग्रेस आणि विरोधक जातीजातींमध्ये मतभेद करुन त्यांना वेगवेगळं करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. पंतप्रधान मोदींच्या आरोपांना आता उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.  आम्हाला काय शिकवता, आम्ही सगळे एकत्र आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातल्या सभेतून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी काँग्रेसवर आरोप करताना पंतप्रधान मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं ची घोषणा दिली. याआधीही योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. या घोषणेला आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बुलढाण्यातल्या सभेत बोलताना कटेंगेंची गोष्ट करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"त्यांनी सांगितलं आहे की एक हैं तो सेफ हैं, बटेंगे तो कटेगें. कोण कापणार आहे, कुणाची हिम्मत आहे. कटेंगेंची गोष्ट करणाऱ्यांना आम्ही भुईसपाट करणार आहोत. आम्हाला काय शिकवता. आम्ही सगळे एकत्र आहोत.  बारा बलुतेदार समाज माझ्यासोबत आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या घोषणेवरुन अजित पवार यांनीही रोष व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. "महाराष्ट्राची तुलना इतर राज्यांशी कोणी करू नये. येथील लोकांनी नेहमीच जातीय सलोखा राखला आहे. बाहेरून काही लोक इथे येऊन घोषणा देतात. पण महाराष्ट्राने जातीय विभाजन कधीच मान्य केले नाही. येथील लोक छत्रपती शाहूजी महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे पालन करतात," असं अजित पवार म्हणाले.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray has criticized Prime Minister Narendra Modi for his slogan Ek Hain To Seif Hain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.