शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:31 PM2024-10-24T16:31:58+5:302024-10-24T16:34:05+5:30
या मतदारसंघात ५० वर्ष गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून शेकापने नेतृत्व केले आहे. त्यामुळे ही जागा शेकापला सोडावी अशी त्यांची मागणी होती
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली. त्यात सांगोला मतदारसंघात दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र या जागेवरील उमेदवार बदलणार का अशी चर्चा सुरू आहे. सांगोला जागेवर मविआतील घटकपक्ष शेतकरी कामगार पक्षाने दावा केला आहे. ही जागा शेकापला द्यावी यासाठी शरद पवारही आग्रही आहेत. शरद पवार आणि देशमुख कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे मविआत जर संघर्ष झाला तर देशमुखांच्या पाठीशी शरद पवार १०० टक्के राहतील असा विश्वास शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
शेकापने या मतदारसंघात बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर ठाकरे गटाने दीपक आबांना रिंगणात उतरवलं आहे. महाविकास आघाडीत या जागेवरून संघर्ष सुरू आहे. त्यात शरद पवारांच्या मध्यस्थीने काही तोडगा निघतो का हे पाहणे गरजेचे आहे. सांगोल्यात शेकापने बाबासाहेब देशमुखांना उमेदवारी जाहीर केली ती शरद पवारांच्या चर्चेनंतरच केल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तर २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेने जिंकली होती. त्यामुळे या जागेवर आम्ही उमेदवार घोषित केला आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे असं संजय राऊतांनी सांगितले आहे.
तर आमच्या नेत्यांचं माहिती नाही, परंतु जर उद्या तिथे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना जवळून ओळखतो. त्यांनी मला प्रचाराला बोलावले तर मी त्याठिकाणी नक्कीच जाईन. कारण १-२ जागा अशा आहेत जिथे ज्या गोष्टी घडायला नको त्या घडल्यात. तरीसुद्धा उद्धव ठाकरे पक्षातील नेते नक्कीच काही मतदारसंघाबाबत फेरविचार करतील. मोठं मन दाखवतील आणि सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे असं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केले आहे.
सांगोला मतदारसंघात काय परिस्थिती?
सांगोला मतदारसंघात मागील निवडणुकीत शहाजी बापू पाटील हे विजयी झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शहाजी पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरेंकडून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू होती. गेल्या निवडणुकीत आघाडीकडून हा मतदारसंघ शेकापला सोडण्यात आला होता. या मतदारसंघात ५० वर्ष गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून शेकापने नेतृत्व केले आहे. त्यामुळे ही जागा शेकापला सोडावी अशी त्यांची मागणी होती. परंतु ठाकरे गटाने या मतदारसंघात नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून ठाकरे गटात प्रवेश केलेले दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली. तर शेकापनेही या मतदारसंघात बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सांगोला मतदारसंघात शेकाप आणि ठाकरे गटातील वाद शरद पवारांच्या मध्यस्थीने मिटणार का, शरद पवारांनी शेकापला दिलेला शब्द लक्षात घेऊन ठाकरे उमेदवार बदलणार का हे काही दिवसांत स्पष्ट होईल.