एकाच जिल्ह्यात ३ ठिकाणी काका विरुद्ध पुतणे मैदानात
By सोमनाथ खताळ | Published: October 30, 2024 12:27 PM2024-10-30T12:27:50+5:302024-10-30T12:29:22+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : बीड मतदारसंघात पहिल्यांदाच काका विरोधात दोन पुतणे मैदानात असतील. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे
Maharashtra Assembly Election 2024 : बीड : जिल्ह्यात यावेळी विधानसभा निवडणुकीत नात्यातील लढती रंगतदार होऊ पाहात आहेत. त्यात गेवराई मतदारसंघात पंडित काका-पुतणे आमने-सामने असणार आहेत तर बीड मतदारसंघातून क्षीरसागरकाका विरोधात दोन पुतणे मैदानात उतरले आहेत. दोघांनाही युती आणि आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली असून, काका अपक्ष मैदानात असतील.
बीड मतदारसंघात पहिल्यांदाच काका विरोधात दोन पुतणे मैदानात असतील. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे तसेच डॉ. योगेश क्षीरसागर अजित पवार गटाकडून, तर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे काका विरोधात दोन पुतणे मैदानात उतरले आहेत.
पंडितांमध्ये लढाई
गेवराई मतदारसंघात उद्धवसेनेकडून बदामराव पंडित (काका), तर अजित पवार गटाकडून (पुतण्या) निवडणूक लढत आहे. भाजपचे आ. लक्ष्मण पवार हे अपक्ष असतील. २०१९ मध्येही अशीच तिरंगी लढत झाली होती. दोन पंडित काका-पुतण्याच्या वादात पवारांनी गुलाल उधळला होता. यावेळी अशीच काहीशी स्थिती आहे.
अन् कुटुंबातील वाद टळला
माजलगाव येथील प्रकाश सोळंके आणि जयसिंह सोळंके या काका-पुतण्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती परंतु ऐनवेळी अजित पवार यांनी प्रकाश सोळंके यांचे नाव घोषित केले. त्यामुळे येथे कुटुंबातील वाद टळला.