'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:07 PM2024-10-26T16:07:03+5:302024-10-26T16:09:16+5:30
Vasantrao Deshmukh Sanjay Raut, balasaheb Thorat: जयश्री थोरात यांच्यावर टीका करण्यापूर्वी वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली. कमी मतं घेणारा उमेदवार मिळावा म्हणून थोरात हे ठाकरे-राऊतांना ऑफर द्यायचे असा आरोप त्यांनी केला.
Vasantrao Deshmukh News: भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आले. वसंतराव देशमुख यांनी याच कार्यक्रमात बाळासाहेब थोरात आणि संजय राऊतांवरही टीका केली. बाळासाहेब थोरात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पाया पडतात. ते शरद पवारांचा पट्टा गळ्यात घालून फिरतात, असे वसंतराव देशमुख म्हणाले. इतकंच नाही, तर संजय राऊतांबद्दलचा एक जुना किस्सा सांगताना मी त्यांना तुम्ही सुपारी बहाद्दर आहात, असे म्हटलो होतो, असा दावाही त्यांनी या सभेत केला.
सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळाव्यात बोलताना वसंतराव देशमुख बाळासाहेब थोरातांना लक्ष्य करताना म्हणाले, "हे रोज तिकडे शरद पवारांच्या पाया पडतंय. उद्धव ठाकरेच्या पाया पडतंय. गेल्या २० वर्षापासून या तालुक्याला मी सांगतोय की, आमचा हा आमदार शरद पवारांचा गळ्यात पट्टा अडकवणारा आहे. पट्टा अडकून घेतलेला. त्याला काय म्हणतात? (गर्दीतून लोक बोलले कुत्रा) हो. तो काँग्रेसी नाहीये. त्याला काहीच घेणं नाही. त्याला फक्त शरद पवार पाहिजे", अशी टीका वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.
उद्धव ठाकरे, संजय राऊतांना ऑफर
"गेली २०-२५ वर्षे हा माणूस उद्धव ठाकरे आणि त्यांचा संजय राऊत यांच्याशी संधान ठेवून होता. दरवेळी ऑफर द्यायचा. जो उमेदवार कमी मतं घेईल, असा उमेदवार आम्हाला द्या. त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काहीही देतो", असा आरोप वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरातांवर केला.
"संजय राऊतांना म्हणालो, तुम्ही सुपारी बहाद्दर आहात"
यावेळी वसंतराव देशमुख यांनी संजय राऊतांसोबतचा जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले, "पाच वर्षापूर्वी आमच्या एका नातेवाईकाच्या पत्नीच्या अत्यंसंस्काराला मी गेलो होतो. ते आयएएस अधिकारी होते. त्यांच्या घरी संजय राऊत आले. त्यांना माझी ओळख करून दिली. त्यांनी (संजय राऊत) मला विचारलं की, आमच्या शिवसेनेला तिथे स्थान का मिळत नाही? मी म्हटलं तुम्हाला पैसे पाहिजे. मिस्टर संजय राऊत, तुम्ही सुपारी बहाद्दर आहात", असे सांगत देशमुखांनी थोरात आणि राऊतांवर टीका केली.