आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 08:55 AM2024-10-27T08:55:20+5:302024-10-27T08:57:19+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : मतदारसंघात माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने अशोकराव निलंगेकर यांचा प्रबळ दावा होता. परंतु, काँग्रेसकडून अभय साळुंके यांचे नाव जाहीर झाले आहे.
- गोविंद इंगळे
निलंगा (लातूर) : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे पुत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्याने निलंगा विधानसभा मतदारसंघात बंडाचे निशाण फडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अशोकराव निलंगेकर यांनी, ‘आम्ही काँग्रेसला सोडले नाही. काँग्रेसने आम्हाला सोडले,’ असे सूचक विधान केले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने पहिल्यांदाच निलंगेकर परिवार सोडून उमेदवारी जाहीर केली आहे.
१९६२ पासूनची स्थिती पाहली तर काँग्रेसकडून डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर, दिलीपराव निलंगेकर व भाजपाकडून माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. अपवाद वगळता मतदारसंघावर या परिवाराचीच पकड राहिली आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या निधनानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. मतदारसंघात माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांना
मानणारा मोठा वर्ग असल्याने अशोकराव निलंगेकर यांचा प्रबळ दावा होता. परंतु, काँग्रेसकडून अभय साळुंके यांचे नाव जाहीर झाले आहे.
माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांनी कधीही सत्तेसाठी पक्ष बदलला नाही. त्यांचाच वारसा घेऊन २० वर्षांपासून सक्षमपणे काम पाहिले. परंतु, पक्षाने निलंगेकर घराण्याचेच तिकीट कापले. आम्हाला काँग्रेसनेच सोडले. त्यामुळे पुढे काय निर्णय घ्यायचा, हे रविवारी समर्थकांच्या बैठकीत ठरवू.
- अशोकराव निलंगेकर