"शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, पण निवडणुकीनंतरच ठरेल मुख्यमंत्री, CM कोण होणार ते आमचे संसदीय मंडळ ठरवेल", देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 07:18 AM2024-09-07T07:18:51+5:302024-09-07T07:19:43+5:30

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणूक आमची महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढेल, पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ हे शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून ठरवेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. 

Maharashtra Assembly Election 2024: "We will fight under Eknath Shinde's leadership, but the Chief Minister will be decided only after the elections, our parliamentary board will decide who will be the CM", Devendra Fadnavis clarified. | "शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, पण निवडणुकीनंतरच ठरेल मुख्यमंत्री, CM कोण होणार ते आमचे संसदीय मंडळ ठरवेल", देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

"शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, पण निवडणुकीनंतरच ठरेल मुख्यमंत्री, CM कोण होणार ते आमचे संसदीय मंडळ ठरवेल", देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

मुंबई - आगामी विधानसभा निवडणूक आमची महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढेल, पण निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ हे शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून ठरवेल, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. 

महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यायचा नाही, अशी भूमिका आधीच घेतली आहे. संख्याबळानुसार आम्ही मुख्यमंत्री ठरवू, असे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. आता महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेही मुख्यमंत्रीपद कोणाला ते विधानसभा निवडणुकीनंतरच ठरेल हे स्पष्ट केले. 

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आणि नंतर नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांना  असे विचारण्यात आले की, महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत वाद आहे का आणि पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? त्यावर ते म्हणाले की, आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जेव्हा मुख्यमंत्री असतात, तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो, निवडणुकीत चेहरा हा मुख्यमंत्र्यांचाच असतो आणि  त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली जाते. 

‘तो’ अधिकार मला नाही
- निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार, हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचे संसदीय मंडळ हे एकनाथ शिंदे, अजित पवार या दोन पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेईल. सरकार म्हणून आम्ही निवडणुकीचा प्रचार एकत्र करत आहोत. 

- विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असा शब्द तुम्ही दिला आहे का? असा प्रश्न केला असता फडणवीस म्हणाले की, असा शब्द देणे या गोष्टी आमच्या पातळीवर नसतात. ती चर्चा संसदीय मंडळात होते. शिंदेंशी या मंडळाची चर्चा झाली असेल. 

दादा गुलाबी झाले पण...
अजित पवार गुलाबी झाले, पण भगवे झाले नाहीत, संघ-भाजपनेही त्यांना अद्याप स्वीकारलेले नाही का?, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, शिंदे यांच्या शिवसेनेशी आमची नैसर्गिक युती झाली, अजित पवार यांच्यासोबतची युती ही राजकीय होती. येत्या काही वर्षांत ती पण नैसर्गिक युतीत बदलेल. आमच्यासोबत आल्यापासून त्यांच्यात बरेच बदल झाले आहेत, आमचे गुण त्यांना लागणारच ना!  मविआत मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव हे शरद पवार यांच्या मनात नाही. त्यांच्या मनात कोणते नाव आहे, हे सांगणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही. माझ्या नेतृत्वात महायुती लढते आहे. आम्हाला राज्याला द्यायचे आहे, जनता काय ते ठरवेल, तुम्ही कितीही विचारले, तरी आमच्यात वाद होणार नाही. 
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: "We will fight under Eknath Shinde's leadership, but the Chief Minister will be decided only after the elections, our parliamentary board will decide who will be the CM", Devendra Fadnavis clarified.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.