"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 10:46 AM2024-11-15T10:46:55+5:302024-11-15T10:47:43+5:30

राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असून माहीम मतदारसंघात ठाकरेंच्या एन्ट्रीनं चुरस निर्माण झाली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 - We will take Amit Thackeray to the MLC, Eknath Shinde attempt, but MNS Raj Thackeray will fight in this situation - Devendra Fadnavis | "अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई - आम्ही अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले परंतु सदा सरवणकरांनी दिलेलं लॉजिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पटलं.  अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेऊ हे शिंदेंनी मला राज ठाकरेंशी बोलायला सांगितले. परंतु ते ठाकरे आहेत, त्यामुळे माघारीचा प्रश्न उरला नाही. राज म्हणाले की, तुम्हाला मदत करायची असेल तर करा, मी लढणार आहे असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं मुख्यमंत्री आणि माझ्याही मनात होते, त्याप्रमाणे राज ठाकरेंशी बोलणं झालं होते. पण तिथले जे आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. तुमचं नुकसान होणार नाही मी तुम्हाला विधान परिषद देतो असं मुख्यमंत्र्‍यांनी सरवणकरांना सांगितले. मात्र सदा सरवणकरांनी असं लॉजिक मांडले, आम्ही उबाठा सोडून इथं आलो आहोत. जर मी लढलो नाही तर ती मते थेट उबाठाला जातील ती अमित ठाकरेंना जाणार नाहीत. त्यामुळे हमखास उबाठाचा फायदा होईल. सरवणकरांनी मांडलेले लॉजिक मुख्यमंत्र्‍यांना पटलं असं मला वाटतं हे फडणवीसांनी सांगितले. झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच सरवणकरांचे म्हणणं बरोबर आहे असं मुख्यमंत्र्‍यांना वाटलं म्हणून मुख्यमंत्र्‍यांनी दुसरा प्रयत्न केला. मला त्यांनी सांगितले तुम्ही राज ठाकरेंशी बोला, अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेऊ. पण राज ठाकरे हे शेवटी ठाकरे आहेत. त्यांनी एकदा घोषणा केली की परत घेण्याचं काही कारण नाही. मी घोषणा केलीय, तुम्हाला मदत करायची असेल तर करा, मी लढणार आहे. त्यामुळे दुर्दैवाने जे काही घडले ते आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर शिंदेसेनेकडून सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत यांचं कडवं आव्हान आहे. लोकसभेला राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीममधून अमित ठाकरेंसमोर महायुती उमेदवार देणार नाही अशी चर्चा सुरू होती. मात्र सरवणकरांनी इथून लढण्याची तयारी केली होती. त्यांना शिंदेंनी उमेदवारी दिली. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - We will take Amit Thackeray to the MLC, Eknath Shinde attempt, but MNS Raj Thackeray will fight in this situation - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.