नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 07:58 AM2024-11-06T07:58:25+5:302024-11-06T07:59:25+5:30

Maharashtra Assembly Election 2024: रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून उचलबांगडी होण्यासाठी अहिल्यानगरचे प्रकरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Election 2024: What are the exact reasons for Rashmi Shukla's rise? The information that came up | नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती

नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती

मुंबई : रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून उचलबांगडी होण्यासाठी अहिल्यानगरचे प्रकरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

अहिल्यानगरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि विखे-पाटील समर्थक वसंत देशमुख यांनी जाहीर भाषणात अपशब्द वापरले होते. याप्रकरणी जयश्री थोरात यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी जयश्री आणि सोबतच्या महिलांना बराच काळ ठाण्याबाहेर थांबवले. तसेच जयश्री यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विरोधकांनी पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने दीपक मिश्रा, बी. आर. बालकृष्णन व राम मोहन मिश्रा या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथे निरीक्षक म्हणून पाठवले. या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून याप्रकरणी राज्य पातळीवरून दबाव आल्याचे नमूद केले होते.

फोन टॅप केल्याच्या आरोपांनंतर चर्चेत
■ शुक्ला यांच्यावर विरोधकांनी फोन टेंप केल्याचा आरोप सातत्याने केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्याच्या आरोपांनंतर शुक्ला चर्चेत आल्या होत्या.
• राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शुक्ला अवैध फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता.
• त्यामुळे निवडणुकीच्या काळात अशा व्यक्तीने राज्याच्या पोलीस महासंचाल कपदी राहू नये अशी मागणी काँग्रेस- कडून करण्यात आली होती.

मुदतवाढीतही अपवाद
सहा महिन्यांपेक्षा कमी काळ शिल्लक असताना शुक्ला यांना २ वर्षे मुदतवाढ दिली. एखाद्या महासंचालकाला किमान सहा महिने निवृत्तीसाठी शिल्लक असतील तर दोन वर्षे मुदतवाढीचा लाभ मिळू शकतो. शुक्ला मात्र त्यास अपवाद ठरल्या होत्या. मविआने याबाबत आक्षेप घेतला होता.

नवे पोलिस महासंचालक
रश्मी शुक्ला यांच्या जागी आलेले नवे पोलिस महासंचालक संजय वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते राज्याच्या कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. वर्मा न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. माझ्यावर जो विश्वास दाखवून जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल आभारी आहे. राज्यातील निवडणुका शांततापूर्ण मार्गाने पार पडतील या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येईल, असे संजय वर्मा यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: What are the exact reasons for Rashmi Shukla's rise? The information that came up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.