हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:10 PM2024-11-14T12:10:31+5:302024-11-14T12:15:01+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. यावरून आता माढ्यातील महायुतीच्या सभेतील भाषणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. तसेच, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. यावरून आता माढ्यातील महायुतीच्या सभेतील भाषणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली. काँग्रेसवाल्यांनी तर सांगितले की आम्ही सत्तेत आलो की पहिले ही योजना बंद करू. मला प्रश्न पडला की, इतकी चांगली योजना आहे. महिलांना दीड हजार रुपये मिळत आहे. पण ही योजना सगळ्यांना का बंद करायची आहे? तुतारीच्या खासदार बोलल्या दीड हजारामध्ये काय होतं? वांग्याच्या शेतामधून कोट्यावधी उत्पन्न घेणाऱ्यांना, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या आणि हॉटेलमध्ये दीड हजार रुपयांची टीप देणाऱ्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार? असा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला.
पुढे रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ही तुमची कोणती मानसिकता आहे. तुम्ही दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींचा अपमान केला आहे. तुम्ही जाहीररित्या माफी मागितली पाहिजे. कारण, एका भावाने बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे. तिला आर्थिक सक्षम करण्यासाठी दिलेली ही ओवाळणी आहे. त्याची तुलना तुम्ही विकत घेण्यापासून तर बहिणीच्या नात्यापर्यंत करत आहात. हा आमच्या आत्मसन्मानाचा झालेला अपमान आहे. तुतारीवाले तुमच्या विरोधात आहेत. तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून ते विरोध करत आहेत, कोर्टात जात आहेत. तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवत आहेत. त्यामुळे जिथे जिथे तुतारीचा उमेदवार आहे, त्याविरोधात आपल्याला मतदान करायचे आहे, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी उपस्थित लोकांना केले.