मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
By मनीषा म्हात्रे | Published: November 8, 2024 10:14 PM2024-11-08T22:14:54+5:302024-11-08T22:16:57+5:30
Raj Thackeray Speech: महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. - राज ठाकरे.
भांडुप पूर्वेकडील दातार कॉलनी येथे मनसे नेते राज ठाकरे यांची सभा झाली. विक्रोळीचे उमेदवार विश्वजित ढोलम यांना निवडून देण्याचे आवाहन राज यांनी केले. यावेळी पुढच्या ७-८ दिवसात आणखी एक सभा विक्रोळीला घेणार असल्याचे ते म्हणाले. कोण दादागिरी करत असेल तर त्याला दुप्पट दादागिरी करणार असल्याचा इशारा राज यांनी दिला.
महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. महाराष्ट्राचा विचका करून टाकला आहे, याचा बदला २० तारखेला घ्यायचा आहे, अशी टीका राज यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
यावेळी राज यांनी बाळासाहेबांची आठवण सांगितली. मी लहान होतो, आमचे गाडीचे चालक माने म्हणून होते. तुळशी रोड म्हणून एक रोड आहे. तिथे एक ब्लू पर्ल येथे शिवसेनेचे कार्यालय होते. मला बाळासाहेबांनी घेतले आणि आम्ही निघालो तिकडे. तेव्हा माने आले नव्हते. आम्ही टॅक्सी केली, आम्ही चाललो ट्रॅफिक नव्हते. ७३-७४ सालची गोष्ट असेल. महापौरांची इम्पाला गाडी होती, सुधीरभाऊ आले. बाळासाहेबांचे काम होते, ते बोलले मी सोडतो तुम्हाला, तेव्हा बाळासाहेब बोलले मी लाल दिव्याच्या गाडीत बसणार नाही असे म्हणत आम्ही ट्रक्सीनेच पुढे निघालो. बांद्रा येथे मागे पाहिले तर लाल दिव्याची गाडी मागून येत होती, असे राज म्हणाले.
यावरून राज यांनी ज्याने लहानपणी असे पाहिले तो बसेल का लाल दिव्याच्या गाडीत? असा सवाल केला. मात्र एकाने ज्यांच्या विरोधात लढला त्यांच्या सोबत मुख्यमंत्रीपदासाठी जाऊन बसला. मुख्यमंत्री झाल्यानंतर धांगेखालून ४० आमदार गेले. शिंदे आले, ते म्हणाले अजित पवार असतील तिथे मी बसणार नाही. अचानक भाजपने दुसरीकडे डोळा मारला. मांडीला मांडी लावून बसणार नव्हते ते आता मांडीवर येऊन बसलेत, अशी टीका राज यांनी केली. तुम्ही लाचार सारखे यांना मतदान करताय, तुम्हाला गृहीत धरले जाते. क दिवस जगलात मतदानाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मेला तरी चालेल, असे राज यांनी मतदारांना म्हटले.
ग्रामीण भागातील मुले मुंबई पुण्यात येतात, आणि तिथली मुले विदेशात जातायत. सगळीकडे बोजवारा सुरू आहे, आणि यांचे राजकीय खेळ सुरू आहेत. बाळासाहेब म्हणाले होते माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस झाली तर शिवसेना नावाचे दुकान बंद करेन अन त्यांचे चिरंजीव काँग्रेसच्या पंज्याचा प्रचार करत आहेत, असा टोला राज यांनी लगावला.
मी शिवसेना सोडत होतो तेव्हा ३५ आमदार आलेले...
मला काही गोष्टी पटल्या नाहीत. मी बाहेर पडलो ३५ आमदार आले होते माझ्याकडे, १५ खासदार आले होते, मला म्हणाले जाऊ काँग्रेस सोबत, पण मी नाही म्हणालो. शिवसेना फोडून मला काही करायचे नव्हते. बाकीचे बाळासाहेबांच्या नावाने मत मागतात. मी माझ्या जीवावर आलो आहे. एकदा या राज ठाकरेला संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा येणार नाही, त्यांच्या सारखं निर्लज्ज नाही मी. असे राज ठाकरे म्हणाले.