"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:27 PM2024-10-31T17:27:35+5:302024-10-31T17:29:18+5:30
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील तर कधी टॉप गिअर टाकतील, याचा नेम नसतो', असे संजय शिरसाट म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गट आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यातच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह घेण्यावरून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर टीका केली होती. त्यावरून आता शिंदे गटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील तर कधी टॉप गिअर टाकतील, याचा नेम नसतो', असे संजय शिरसाट म्हणाले.
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, ते राज ठाकरे आहेत. ते कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी टॉप गिअर टाकतील याचा नेम नसतो. म्हणून ते त्यांची भूमिका त्यांच्या मर्जीने घेतात. कुणी सांगितलं म्हणून भूमिका घेतली असं त्यांचं नसतं. शिवसेनाप्रमुख जशा भूमिका घ्यायचे, तसे बेछूटपणे भूमिका घेण्याचा राज ठाकरे यांचा स्वभाव आहे. त्या स्वभावाला अनुसरून त्यांनी घेतलेली ती भूमिका आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
दरम्यान, काल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणावरही भाष्य केलं होतं. पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नसल्याचे म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावला होता. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा तुमच्या हाती लागणार नाही हे मी त्यांना सांगितलं होतं. हे सांगून हट्टा पायी जागा पाडायच्या असतील तर पाडून घ्या. ती जर जागा आम्ही लढलो असतो १०० टक्के चित्र वेगळं असतं. त्यानंतर ते सांगतात की तुम्ही आमच्या निशाणीवर निवडणूक लढवली पाहिजे. कसं आहे मी लोकांमधून कमावलेली निशाणी आहे ढापलेली नाही. इतक्या वर्षांच्या निवडणुकीच्या प्रवासात मिळालेली निशाणी आहे. ती निशानी लोकांच्या मतदानातून मिळालेली आहे कोर्टातून आलेली नाही," असं राज ठाकरे म्हणाले होते.