महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:32 PM2024-10-16T16:32:39+5:302024-10-16T16:53:05+5:30
Maharashtra Assembly Election 2024: आज झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकीचं रणशिंग वाजल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या रणधुमाळीला सुवात झाली आहे. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांतील महाविकास आघाडी यांच्यातच मुख्य लढत रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असावा आणि तो घोषित करावा का, यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. तर सत्ताधारी महायुतीनेहीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव पुढील मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेलं नाही. मात्र आज झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केले आहे.
महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, अशी विचारणा करण्यात आली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्हाला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज नाही. आमचे मुख्यमंत्री तर इथे बसलेले आहेत, असे सूचक विधान केले. मात्र फडणवीस यांनी या दरम्यान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कुणाचंही नाव घेतलं नाही. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, असे आव्हानही दिले.
फडणवीस पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करत नाही आहे, कारण निवडणुकीनंतर त्यांच्या मुख्यमंत्री बनेल, असं त्यांना वाटत नाही. मी शरद पवार यांना आव्हान देतो की, त्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा.
दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनीही महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत स्पष्टपणे काहीही विधान केलं नाही. आमच्या सरकारचं दोन वर्षांपासूनचं काम आणि कामगिरी हाच महायुतीचा चेहरा आहे. आता महाविकास आघाडीने त्यांच्या नेत्याला आपला चेहरा घोषित केलं पाहिजे.