वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:53 AM2024-11-07T06:53:35+5:302024-11-07T06:54:40+5:30
Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिंदेसेनेचे राज्यसभा खा.मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यातील तिरंगी लढतीमुळे वेगळे चित्र निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
- महेश पवार
मुंबई - मुंबईतील ३६ विधानसभा जागांसाठी सात प्रमुख राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र, यात वरळी महत्त्वाचे रणांगण बनले आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिंदेसेनेचे राज्यसभा खा.मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांच्यातील तिरंगी लढतीमुळे वेगळे चित्र निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
वरळी मतदारसंघात बीडीडी चाळ, डिलाईल रोड, कोळीवाडा, वरळी सी फेस असे विभाग येतात. उच्चभ्रू मतदारांची संख्याही येथे अधिक आहे. २०१९ मध्ये आदित्य यांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली, त्यावेळी शिवसेनेने सेफ गेम खेळला होता. मनसेने उमेदवार न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश माने यांचा सुमारे ६० हजार मतांनी पराभव करून एकहाती विजय मिळविला होता. आदित्य यांच्या वरळी प्लस संकल्पनेला मनसेचे देशपांडे यांची वरळी व्हिजनने प्रत्युत्तर दिले. दुसरीकडे शिंदेसेनेचे देवरा राजकारणातील सुसंस्कृत चेहरा मानले जात असल्यामुळे या दोन्ही नेत्यांचे आव्हान आदित्य यांच्यासमोर असेल.
वरळीत उच्चभ्रू व परप्रांतीय मध्यमवर्गीयांत भाजपला मानणारा मोठा वर्ग वरळीत आहे, तर मनसेमुळे मराठी मतदारांतील विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरणार हे निकाल ठरवेल.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
येथील गिरण्या आणि गिरणी कामगारांच्या चाळीच्या जागेवर टोलेजंग इमारती, मल्टिप्लेक्स उभे राहिले. मात्र, चाळकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्ष रेंगाळला आहे.
कामगार आणि पोद्दार या दोन प्रमुख रुग्णालयांकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष.
रेसकोर्स, मुंबईतील सर्वात मोठा धोबीघाट येथील समस्या सोडविण्यात आलेले अपयश.
कोस्टल रोडमुळे ट्रॅफिक जॅमची नवी समस्या उद्भवली आहे. त्यावर काही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
कोळीवाडा गांव येथील सीमांकनचा विषय सोडविण्यात आलेला नाही. जुन्या मालमत्तेचे कागदपत्रांचे विषयही प्रलंबित आहेत.