स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 03:05 PM2024-11-22T15:05:44+5:302024-11-22T15:06:23+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काही धक्कादायक कल समोर येऊन महायुतीचं बहुमत हुकलं तरीही राज्यात सत्ता स्थापन करता यावी, या दृष्टीने भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
विविध एक्झिट पोलमधून राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणीपूर्वी भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, निकालांमध्ये काही धक्कादायक कल समोर येऊन महायुतीचं बहुमत हुकलं तरीही राज्यात सत्ता स्थापन करता यावी, या दृष्टीने भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महायुतीला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४५ जागा मिळाल्या नाहीत तर सरकार कसं स्थापन करता येईल, याबाबतचा प्लॅन बी महायुतीने तयार करून ठेवला आहे.
कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी महायुतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीला बहुमत न मिळाल्यास महायुतीकडून अपक्ष आणि छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी महायुतीकडून प्लॅन बी अॅक्टिव्ह करण्यात आला आहे. सध्यातरी स्पष्ट बहुमतासह आपली सत्ता येईल, असा विश्वास महायुतीमधील मित्रपक्षांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र काही गडबड झाल्यास अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याची तयारी महायुतीकडून करण्यात आली आहे. तसेच सरकार स्थापनेच पाठिंबा देणाऱ्या पक्षांना सरकारमध्ये सामावून घेण्याची तयारीही महायुतीकडून करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत महाविकास आघाडी सोबत नसलेल्या आणि स्वबळावर निवडणूक लढवलेल्या छोट्या पक्षांना सोबत घेण्यावर महायुतीकडून भर दिला जात आहे. त्यामध्ये बहुजन विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार जनशक्ती पार्टी या पक्षांचा समावेश आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार महायुतीचे नेते या पक्षांच्या संपर्कामध्ये आहेत.
दुसरीकडे एक्झिट पोलमधील अंदाज विरोधात गेले असले तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यात विजय मिळवण्याचा दावा केला जात आहे. तसेच सत्तास्थापनेची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून बैठका घेऊन रणनीती आखली जात आहे. महाविकास आघाडीनेही बंडखोर अपक्ष आणि छोट्या पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश एक्झिट पोलमधून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर येईल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच एका एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना ३१ टक्के, उद्धव ठाकरे यांना १८ टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांना १२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.