काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 04:35 PM2024-11-17T16:35:12+5:302024-11-17T16:38:30+5:30

जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

Maharashtra Assembly Election 2024 - Will give zero electricity bill for farmers for next 5 years for agriculture pump, Devendra Fadnavis criticizes Congress | काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

चांदवड - सरकार लोकांचे मत समजून घेणारे असते. कांद्यावरील निर्बंध दूर केले. आम्हाला ठेच लागली आहे. आम्ही यापुढे ताकही फुंकून पिणार आहे. जोपर्यंत मोदी सरकार आहे तोपर्यंत कांद्यावर अचानक निर्यात बंदी लागणार नाही असं ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. 

चांदवड येथील जाहीर सभेत फडणवीस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस आणि सोयाबीनचा भाव पडला. ४ हजार कोटी आम्ही सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर दिले. ४०० खरेदी केंद्रे उघडली. आचारसंहितेपूर्वी आम्ही केंद्राला पत्र पाठवले होते. सगळ्या सोयाबीनची खरेदी राज्य सराकर हमीभावाने करेल. आम्ही भावांतर योजना आणली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी होईल त्यातील जे अंतर असेल त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही देऊ. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा सरासरी दर ३८०० रुपये आहे. महाराष्ट्रात येऊन सांगतात ७ हजार रुपये भाव देऊ, लबाडाचं आवतन आहे. आम्ही जे बोलतो तेच करतो, ६ हजार रुपये सोयाबीनला भाव देणारच. १ रूपयांत पिकविमा दिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना विजबिलाची माफी दिली. शेतकऱ्यांना शेतीपंपाचे शून्य वीजबिल पुढचे ५ वर्ष येईल. ३६५ दिवस दिवसा वीज द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे म्हणून या देशातील पहिली शेती वीज वितरण कंपनी मी महाराष्ट्रात तयार केली. या कंपनी अंतर्गत १४ हजार मेगावॅट सौर प्रकल्पाला मान्यता दिली. पुढच्या काही महिन्यात ३६५ दिवस दिवसा शेतकऱ्यांना वीज मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याशिवाय पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, राहुल अहेर हॅट्रीक करून आले तर शेतकऱ्यांच्या ७/१२ वर कर्जाचा उतारा राहणार नाही. आम्ही कर्जमाफी करू. प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचं काम महायुती सरकारने केले. विकसित भारत करायचा असेल तर या देशाची ५० टक्के लोकसंख्या म्हणजे महिला सामाजिक, आर्थिक प्रगतीचं केंद्र होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. लखपती दीदी केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढे आली. व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला १ लाखाहून अधिक कमाई करतात त्या लखपती दीदी आहेत. २०२८ पर्यंत राज्यात ५० लाख महिला लखपती दीदी करायच्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली, त्यातून १५०० रुपये महिलांच्या खात्यावर देतोय. जेव्हा ही योजना आणली तेव्हा काँग्रेस, शरद पवार-उबाठाची माणसे आमची खिल्ली उडवत होते, पण त्यांच्या नाकावर टिच्चून आम्ही महिलांच्या खात्यावर डिसेंबरपर्यंतचे पैसे टाकले. सावत्र भाऊ राज्यात फिरतायेत. तुम्हाला मिळालेली योजना पाहावली नाही म्हणून महाविकास आघाडी कोर्टात गेले. या योजना पैशाचा चुराडा आहे असं कोर्टात म्हटलं पण कोर्टाने त्यांना फटकारलं. लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आता पुन्हा सरकार आल्यावर २१०० रुपये महिलांना देणार आहोत असं आश्वासन फडणवीसांनी सभेत दिले.

दरम्यान,  मी २०१९ ला आलो होतो, तुम्हाला शब्द दिला होता. दुर्दैवाने माझ्याशी बेईमानी झाली, माझे सरकार आलं नाही. मग जेव्हा आले तेव्हा विस्तार करण्यासाठी जागाच नव्हती. आम्ही काही पदे रिक्त ठेवली. आज तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, तुम्ही राहुल आहेर यांच्या रुपाने मला आमदार द्या, पहिल्याच विस्तारात कॅबिनेट मंत्री इथं पाठवतो, माझी एक अट आहे. २० हजाराच्या आत लीड असेल राज्यमंत्री, जर २० हजाराच्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री...मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो असं सांगत फडणवीसांनी राहुल आहेर यांना निवडून देण्याचं आवाहन जनतेला केले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Will give zero electricity bill for farmers for next 5 years for agriculture pump, Devendra Fadnavis criticizes Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.