मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 01:49 PM2024-11-02T13:49:17+5:302024-11-02T13:50:14+5:30
लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेने यंदाच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.
अंबरनाथ - मित्र म्हणून मनसे ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करणार आहे. अंबरनाथ इथं दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला मनसे आमदार राजू पाटील यांनी हजेरी लावली. याचवेळी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे हेदेखील पोहचले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गळाभेट झाली. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. अंबरनाथमध्ये मनसेने उमेदवार दिला नाही. त्यामुळे इथं एकनाथ शिंदे गटाचे बालाजी किणीकर आणि ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांच्यात थेट लढत होणार आहे.
या भेटीनंतर माध्यमांनी आमदार राजू पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अंबरनाथ पुरते बोलायचे झाले तर इथं आमचा उमेदवार नाही. राजसाहेबांकडून आम्हाला काही आदेश आले नाहीत. राजेश वानखेडे हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे मित्र म्हणून आम्ही नक्कीच त्यांना मदत करणार आहोत. पक्षाचा आदेश आल्यानंतर पुढे काय करायचे ते आम्ही पक्ष म्हणून ठरवू असं सूचक विधान त्यांनी केले आहे. तर सर्व मनसैनिक हे माझे मित्र असून ते माझ्यासोबत राहतील याची मला अपेक्षा आहे. मनसे मला मदत करेल याची खात्री नाही तर गॅरंटी आहे असा विश्वास ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी व्यक्त केला.
अंबरनाथ मतदारसंघात काय स्थिती?
अंबरनाथ मतदारसंघात डॉ. बालाजी किणीकर हे शिवसेनेचे आमदार असून शिंदेंच्या बंडानंतर त्यांनीदेखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदेंनी पुन्हा बालाजी किणीकर यांना रिंगणात उतरवलं आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंकडून राजेश मोरे यांना तिकिट देण्यात आले आहे. त्यामुळे मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मनसे ठाकरे गटाला मदत करणार असल्याचं पुढे आले आहे.
माहिममध्ये अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर लढत
माहिम मतदारसंघात खुद्द राज ठाकरेंचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याठिकाणी शिंदेंनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र याठिकाणी भाजपाने अमित ठाकरेंना मदत करण्याची भूमिका घेतली. परंतु कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये ही नेत्यांची जबाबदारी असते असं सांगत शिंदेंनी सदा सरवणकर यांच्या उमेदवारीची पाठराखण केली आहे. त्यात मनसेने कल्याण लोकसभेची आठवण करून देत शिंदेंवर संकुचित विचारांचे असल्याची टीका केली.