शरद पवारांचा डाव राज ठाकरे खेळणार?; बंडखोरांसाठी 'मनसे' पर्याय ठरण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 03:57 PM2024-08-04T15:57:11+5:302024-08-04T16:00:30+5:30
विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळणार असून महायुती आणि मविआतील पक्षांची इच्छुक उमेदवारांमुळे कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यात यंदा महाविकास आघाडी विरोधात महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यातच मनसेकडूनही २०० ते २५० जागा लढण्याची तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे हेदेखील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. राज्यातील विविध भागात जात ते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. मात्र यातच राज हे शरद पवारांचा जुना आवडता डाव यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खेळण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण बदलले. एकेकाळी राज्यात ३-४ पक्ष एकमेकांच्या विरोधात असायचे त्यामुळे बऱ्याच इच्छुकांना अनेक पर्याय उपलब्ध असायचे. इच्छुक उमेदवारही अनेक पक्षांचा शोध घ्यायचे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती हे दोनच पर्याय समोर आलेत. मविआत उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस आणि महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा समावेश आहे. या आघाडी, युतीमुळे सर्व पक्षातील इच्छुकांची गोची झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी विधानसभा रणनीती आखत राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत.
या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून राज ठाकरे सोलापूरपासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करत आहेत. जिल्ह्यातील ११ विधानसभेला मनसेचे उमेदवार उभे कसे करता येतील त्याचा ते शोध घेत आहेत. यंदा सत्तेत कुठल्याही प्रकारे आपला वाटा हवा यादृष्टीने राज आणि मनसे टीम तयारीला लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत एका पक्षाला तिकीट मिळाले तर इतर २ पक्षातील इच्छुक नाराज होतील. त्यात एखादा सक्षम बंडखोर उमेदवार मनसे तिकिटावर उभा राहिला. राज्यात किमान ८ ते १० आमदार निवडून आले तर मनसेचं महत्त्व पुन्हा वाढेल. त्यात जर विधानसभेच्या निकालात मविआ-महायुती यांच्यापैकी कुणालाही बहुमत मिळालं नाही तर मनसेची भूमिका निर्णायक असावी अशी राज ठाकरेंनी रणनीती असावी असं मत लोकमत सोलापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, येत्या विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीचे किती बंडखोर उमेदवार मनसेच्या गळाला लागतात. त्यातील किती निवडून येतात आणि मनसे खरेच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर किंगमेकर बनेल का हे सगळं येणारा काळच ठरवणार आहे.