माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 09:41 AM2024-10-28T09:41:04+5:302024-10-28T09:41:37+5:30

Maharashtra Assembly Election 2024: माहिममध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या लढतीत आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Will Shiv Sena Shinde group support Amit Thackeray in Mahim? Discussion between Chief Minister Shinde and Sada Saravankar, Deepak Kesarkar said.... | माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....

माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या लढतीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या लढतीत आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे आपला उमेदवार मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची खेळी खेळण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबाबत येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री चर्चा केल्याच वृत्त आहे. तसेच सदा सरवणकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे येथे शिवसेना शिंदे गटाकडून काय निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.

या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे, असं सूचक विधान शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी केलं आहे. ‘’लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी एकही जागा न घेता महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता अमित ठाकरे यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे. माहिममध्ये आमचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. त्यांचा योग्य तो मान राखला जाईल. तसेच यावर मुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढतील. अमित ठाकरे राज ठाकरे यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने वाटाघाटी बोलणी सुरू आहेत. मीसुद्धा भेटून आलो आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. शेवट गोड होईल, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. 

शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी माहिम विधानसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ असा दोन वेळा विजय मिळवलेला आहे. २०१९ मध्ये सदा सरवणकर यांनी मनसेच्या संदीप देशपांडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने त्यांना माहिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र मनसेने येथे अमित ठाकरे यांना उमेदवारी दिल्याने येथून निवडणूक लढवावी की अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा, असा यक्षप्रश्न महायुतीसमोर पडला आहे. त्यात भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेना शिंदे गटावर येथील उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Will Shiv Sena Shinde group support Amit Thackeray in Mahim? Discussion between Chief Minister Shinde and Sada Saravankar, Deepak Kesarkar said....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.