Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 07:15 PM2024-11-19T19:15:38+5:302024-11-19T19:16:36+5:30
Kshitij Hitendra Thakur on Vinod Tawde: विनोद तावडे सकाळी १० वाजल्यापासून हॉटेलमध्ये होते. पोलीस खात्यालाही तावडे आलेत हे माहिती नाही. ते देशाचे नेते, एवढा मोठा नेता विरारसारख्या छोट्या गावात येतो, पोलिसांना अंदाज नाही. - क्षितीज ठाकूर.
विनोद तावडेंची माहिती देणारे आरएसएसचे होते. त्यांनाही हे पटत नाही. राजन नाईक दोन तासांपासून महिलांच्या घोळक्यात मान खाली टाकून बसले होते. या महिला कोण होत्या? या महिला तोंड लपवून बसल्या होत्या. त्यांना विचारले तर त्यांनी नाव सांगितले नाही. नाईकांना पत्रकारांनी बोलवूनही ते दोन तास आले नाहीत, असे म्हणत क्षितीज ठाकूर यांनी महिला लपलेला व्हिडीओ दाखविला.
या महिलांना नाव विचारले नाव सांगितले नाही, पत्ता विचारला तर तोही सांगितला नाही. जिन्यावर लपलेले, रेस्टॉरंटमध्ये लपलेले. कोपरे कोपरे पकडून लपलेले. राजन नाईक स्वत: दिसू नये म्हणून लाईट बंद करून महिलांमध्ये लपलेले. दोन तास ते समोर आले नाहीत. मर्द होते तर यायचे होते समोर. हे जे १९ लाख सापडले ते भाजपाच्या निवडणूक खर्चात टाकणार होते का, असा गौप्यस्फोट ठाकूर यांनी केला.
या लोकांनी अख्खे हॉटेल बुक केलेले. ५००-७०० लोक होती. दोन्ही हॉल बुक केले होते. रेस्टॉरंट बुक होती. आम्ही तर हे पैसे आणले नव्हते. आम्ही आलो आणि पाठोपाठ पोलीस आले. उद्या हे म्हणतील या लोकांनी प्लांट केले. निवडणूक आयोग कारवाई करेल अशी अपेक्षा नाही, जनता करेल. आमचे कार्यकर्ते महिलांना काही करणार नाहीत म्हणून हे त्यांच्यात लपले होते. आम्ही पोलीस आणि निवडणूक आयोगाला माहिती दिलेली. पत्रकारांना आम्ही बोलावले नव्हते. त्यांच्याकडून तुम्हाला कोणी माहिती दिली माहिती नाही. पत्रकार आले तर गैर काय, असा सवाल ठाकूर यांनी केला.
एवढी चांगली कामे केली असती तर पैशांची गरज काय पडते? एका बाजुला रामाचे नाव घेणार आणि दुसऱ्या बाजुला पैसे देणार. महिलांना १५०० रुपये देतात आणि इकडे करोडो रुपये वाटतात. महिलांना द्या ना ५० हजार रुपये, तुमचे कॅशमधले व्यवहार कमी करा, असा खोचक टोला क्षितीज ठाकूर यांनी केला. जर आम्ही काम केले नाही तर पैसे वाटायची काय गरज पडली. खासदार येतात आणि सांगतात की ३५ वर्षांत काही झाले नाही. या खासदारांच्याच वडिलांचा मतदारसंघ होता. आपल्याच वडिलांनी काही केले नाही असे सांगत आहेत, असा आरोप ठाकूर यांनी केला.
विनोद तावडे सकाळी १० वाजल्यापासून हॉटेलमध्ये होते. पोलीस खात्यालाही तावडे आलेत हे माहिती नाही. ते देशाचे नेते, एवढा मोठा नेता विरारसारख्या छोट्या गावात येतो, पोलिसांना अंदाज नाही. जर नसेल तर तावडे लपून का आले, जर माहिती होते तर पोलीस का आले नाहीत, असा सवाल क्षितीज ठाकूर यांनी केला.
या महिला कोण होत्या?
या महिला कार्यकर्त्या नव्हत्या, तर त्या पैैसे डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या होत्या. पोलिसांना आम्ही या महिलांना एका बाजुला करून तपासा असे सांगितले, परंतू पोलिसांनी या महिलांना न तपासताच बाहेर काढले, असा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला आहे. एका रुममध्ये ९ लाख, एका रुममध्ये १० लाख रुपये मिळाले. पोलिसांनी या लोकांना रुम तपासायचे आहेत म्हणून सांगून लोकांना न तपासताच बाहेर काढले. ते किती असतील कोणाला माहिती. आमच्यासमोर १९ लाख रुपये मिळाले होते, असा दावा ठाकूर यांनी केला.