महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:48 AM2024-11-25T02:48:46+5:302024-11-25T02:49:38+5:30
वर्ष 2019 चा विचार करता, तेव्हा एकूण 24 महिला विधानसभेत पोहोचल्या होत्या. मात्र आता हा आकडा 22 वर आला आहे.
Maharashtra Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे तर महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झाला आहे. या निवडणुकीत एकूण 4,136 उमेदवार मैदानात होते. यात 363 महिलांचा समावेश होता. अर्थात एकूण उमेदवारांच्या तुलनेत 10 टक्क्यांपैक्षाही कमी महिला मैदान होत्या. मात्र, 2019 चा विचार करता हा आकडा अधिक आहे.
वर्ष 2019 चा विचार करता, तेव्हा एकूण 24 महिला विधानसभेत पोहोचल्या होत्या. मात्र आता हा आकडा 22 वर आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील दोन प्रमुख आघाड्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरवलेल्या 55 महिला उमेदवारांपैकी महायुतीच्या 21 महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत, तर महाविकास आघाडीकडून केवळ एकाच महिला उमेदवाराचा विजय झाला आहे.
मुंबईमध्ये होत्या सर्वाधिक उमेदवार -
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, मुंबईमधून 39 एवढ्या सर्वाधिक महिला उमेदवार होत्या. याशिवाय, ठाण्यात 33, पुण्यात 21, नाशिकमध्ये 20 आणि नागपूरमध्ये16 महिला उभ्या होत्या.
पुण्याच्या पार्वतीमध्ये भाजपाच्या माधुरी मिसाळ आणि एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाच्याच अश्विनी कदम यांच्यात लढत होती. येथे मिसाळ यांनी 1,18,193 मतांसह विजय मिळवला. त्यांच्या विजयातील अंतर 54,660 मतांचे होते. माधुरी मिसाळ यांनी आतापर्यंत चार विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.
नवाब मलिक यांच्या मुलीचा विजय -
मुंबईतील अणुशक्ती नगरमध्ये राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार सना मलिक यांचाही विजय झाला आहे. वडील नवाब मलिक यांच्या जागेवर विजय मिळवत त्या आता राजकारणात उतरल्या आहेत. इतर विजेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांचा समावेश आहे, त्या श्रीवर्धनमधून 1,16,050 मतांनी विजयी झाल्या आहेत. देवळालीत सरोज अहिरे, वसईत भाजपच्या स्नेहा दुबे पंडित, नाशिक मध्यमध्ये देवयानी हरांडे आणि साक्रीत शिवसेनेच्या मंजुळा गावित, यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत मविआचा केवल एकच उमेदवार जिंकला आहे -
या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या मविआच्या केवल एका महिला उमेदवाराचा विजय झाला आहे. धारावी मतदारसंघात काँग्रेसच्या ज्योती गायकवाड विजयी झाल्या आहेत.