'तुल्यबळ उमेदवार भेटला नाही म्हणून बकरी गळ्यात मारली'; सुनील राऊत यांच्या विधानाने वातावरण तापले
By मनीषा म्हात्रे | Published: November 4, 2024 08:39 PM2024-11-04T20:39:10+5:302024-11-04T20:40:08+5:30
सुवर्णा करंजे यांची विक्रोळी पोलिसांत धाव. विक्रोळी विधानसभा मधून शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे आणि मनसेतून विश्वजीत ढोलम निवडणुकीच्या रिंगणात आहे.
- मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत यांनी एका कार्यक्रमांमध्ये केलेल्या विधानाने विक्रोळीत वातावरण तापले आहे. राऊत यांचा व्हिडिओ व्हायरल होताच, शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांनी थेट राऊत यांच्या विरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राऊत यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यात "माझ्यासमोर उभे करण्यासाठी कुणी तुल्यबळ मिळाले नाही. टक्कर बरोबरीने व्हायला हवी. कुणीही माझ्यासमोर टिकले नाही. आता कुणाला तरी बकरा बनवायचा होता तर या बकरीला माझ्या गळ्यात टाकले. २० तारखेला आपण ती बकरी कापून टाकू असे विधान त्यांनी केले आहे. याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल होताच, करंजे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
विक्रोळी विधानसभा मधून शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे आणि मनसेतून विश्वजीत ढोलम निवडणुकीच्या रिंगणात आहे. करंजे यांच्या म्हणण्यानुसार, हे महिलांचे खच्चीकरण करणार वक्तव्य आहे. पूर्वी बाळासाहेबांच्या काळात महिलांच्या संदर्भात असे उच्चार काढण्याची कोणाची हिम्मत नव्हती. परंतु आता मात्र सर्रासपणे अशा पद्धतीने महिलांना हिणवले जात आहे. त्यामुळे आता सरकारने याची दखल घ्यावी असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विनयभंग, धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद लागला आहे. तसेच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.