"निदान सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवा"; शिंदेंनी शाह यांच्याकडे केलेली मागणी, उत्तर आले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 09:23 AM2024-12-04T09:23:53+5:302024-12-04T09:25:51+5:30
Eknath Shinde Maharashtra CM Politics: मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हे आज ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे. यासाठी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निदान पहिल्या सहा महिन्यांसाठी तरी मला मुख्यमंत्री बनवा अशी कळकळीची विनंती केल्याचे समोर येत आहे.
महायुतीला प्रचंड बहुमत असले तरी ११ दिवस उलटूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविता आलेला नाही. यामागे शिंदेंनी आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून केलेले प्रयत्न कारण ठरले आहेत. शिंदेंच्या मागण्यांमुळेच भाजपाला मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करता आलेले नाही. बहुमताच्या जवळ जागा निवडून आल्याने भाजपाला मुख्यमंत्री पद कोणासाठी सोडायचे नाहीय. तर शिंदेंनाही आपल्या नेतृत्वात एवढे बहुमत मिळाले असताना मुख्यमंत्री पद सोडायचे नव्हते. यामुळे भाजपाने शिंदेंचा दावा फेटाळला असून भाजपचाच मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाजप पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी तयार होत नसल्याचे पाहून शिंदेंनी आधी भाजपाला बहुमत आले तर तुम्हालाच मुख्यमंत्री करणार असा भाजपाने शब्द दिलेला याची आठवण करून दिली. यावर भाजपाने तुम्ही भाजप अध्यक्षपदावर असल्याचा विचार करा आणि सांगा, असे उत्तर दिले. यानंतर शिंदेंनी जास्त नको निदान पहिल्या सहा महिन्यांसाठी तरी मला मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली.
यावर भाजपाच्या हायकमांडने तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केले तर चुकीचा पायंडा पडेल असे सांगितले. तसेच सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री करण्याची कोणतीही सिस्टीम नाही. हा चुकीचा निर्णय असेल आणि प्रशासनावरही याचे विपरित परिणाम होतील असे सांगत शिंदेंची ही देखील मागणी फेटाळण्यात आली. टाईम्स ऑफ इंडियाने या बैठकांशी संबंधीत राजकीय नेत्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
या नेत्यानुसार ही बैठक २८ नोव्हेंबरला झाली होती. यामध्ये शिंदेंनी आपल्याला मुख्यमंत्री करावे अशी मागणी लावून धरली होती. यावर भाजपा नेतृत्वाने शिंदेंना एकाच वाक्यात मुख्यमंत्री पदाची मागणी नको, असे सांगितले. तुम्ही स्पष्ट बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री पदाचा दावा सोडाल का, असा सवाल भाजपाने विचारला होता, यावर शिंदे शांत राहिल्याचे या नेत्याने सांगितले आहे.