राम कदम ते सुनील राणे...भाजपचे मुंबईत धक्कातंत्र?; ५ आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:11 PM2024-10-17T14:11:47+5:302024-10-17T14:17:34+5:30
Maharashtra BJP : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काही विद्यमान आमदारांची कापण्यात येणार आहेत असून यामध्ये राजधानी मुंबईतील पाच आमदारांचा समावेश असल्याची माहिती आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर उमेदवार यादी निश्चित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भाजपने यंदा किमान १५० जागा लढवण्याचा पवित्रा घेतला असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पक्षाकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांविरुद्ध मतदारसंघात नाराजी आहे अशा आमदारांची तिकिटे भाजपकडून कापण्यात येणार आहेत असून यामध्ये राजधानी मुंबईतील पाच आमदारांचा समावेश असल्याची माहिती आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला मुंबईत समाधानकारक यश मिळालं होतं. ही कामगिरी कायम ठेवण्यासाठी ज्या विद्यमान आमदारांबाबत मतदारसंघात प्रतिकूल स्थिती आहे, अशा आमदारांना भाजपकडून डच्चू देण्यात येणार आहे. यामध्ये घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांच्यासह वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, सायनचे आमदार तमिल सेल्वन, घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह आणि बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांचाही समावेश असल्याचे समजते. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, भाजपने यंदा खरोखरच कठोर पाऊल उचलत विद्यमान आमदारांची तिकिटे कापल्यास सदर आमदार काय भूमिका घेतात, पक्षाविरोधात बंड करणार की योग्य संधीची वाट पाहणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
५० उमेदवारांची पहिली यादी लवकरच
भाजप मुख्यालयामध्ये काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यामध्ये जागा वाटप, निवडणूक रणनीती आणि लोकांनी दिलेला फीडबॅक यावर चर्चा झाली. कोअर कमिटीने ५० नावांवर शिक्कामोर्तब केलं असून लवकरच या उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विदानसभा निवडणुकीत १६२ जागांवर भाजपने निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी १०५ जागांवर विजय मिळवला होता. आता थोडी परिस्थिती बदललेली आहे. दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष फुटलेले आहेत. त्यात तिसरी आघाडी आलेली आहे. ही आघाडी कोणाची मते आपल्याकडे खेचते, मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन आदी गोष्टींचा या निवडणुकीवर प्रभाव असणार आहे.