मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:51 AM2024-11-24T05:51:37+5:302024-11-24T07:33:14+5:30
Vidhan Sabha Election Result 2024: २०१४ मध्ये सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडिअमवर शपथ सोहळा आयोजित केला होता.
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेला महायुतीने मविआचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. निकालाच्या आदल्यादिवशीच राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी नवीन मुख्यमंत्री राजभवनाच्या बाहेर, वेगळ्या ठिकाणी शपथविधी घेऊ शकतात, असे म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा वानखेडेवर आयोजित हाेण्याची शक्यता आहे.
महायुतीचे नेत्यांकडून सोमवारी वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरु झाली आहे. अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण हे ठरले नसले तरी शपथविधी घेण्याची तयारी सुरु झाली आहे. २०१४ मध्ये सत्ता खेचून आणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडिअमवर शपथ सोहळा आयोजित केला होता.
कोणत्या योजना जनतेला भावल्या?
लाडकी बहीण, महिलांना एसटी प्रवासात सवलत, वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा वर्षाव, शेतकऱ्यांना कृषिपंपांची वीजबिल माफी, कापूस, सोयाबीनसाठीच्या भावांतर योजना अशा लोकाभिमुख निर्णयांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
नांदेड लोकसभेत काँग्रेसचा विजय
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय झाला. काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांनी ५ लाख ८६ हजार ७८८ मते घेतली तर भाजपच्या डॉ. संतुकराव हंबर्डे यांना ५ लाख ८५ हजार ३२१ मते मिळाली. फेरमतमाेजणीनंतर चव्हाण विजयी घाेषित झाले.
झारखंडमध्ये झामुमो आघाडी : मुख्यमंत्री
हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा प्रणीत आघाडीने झारखंड विधानसभेच्या ८१ पैकी ५६ जागांवर आघाडीवर असून, त्यांना या राज्याची सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. तर, भाजपप्रणीत एनडीए आघाडी २३ जागांवर आघाडीवर आहे.