देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:43 AM2024-11-24T05:43:36+5:302024-11-24T05:44:29+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या नावासाठी अनुकूल, फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद द्यावे, यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्सुक आहेत.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय आणि महायुतीने दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहे.
महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेणार आहेत, असे भाजपमधील सुत्रांनी सांगितले. २०२२मध्ये पंतप्रधान मोदी यांनीच महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव निश्चित केले होते. तर, उपमुख्यमंत्रिपदी फडणवीस यांची वर्णी लागली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद द्यावे, यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्सुक आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली संपूर्ण ताकद भाजपच्या मागे उभी केली होती. घरोघरी प्रचाराशिवाय ६० हजारांहून अधिक कोपरा सभा घेतल्या. त्यामुळेच लोकसभेत झालेले नुकसान यंदा भरून काढता आले. 'महायुतीच्या विजयाचे मॉडेल' भाजपाला विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये झेप घेण्यास मदत करू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसलाही (अजित पवार) केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. परंतु, यासाठी थोडा वेळ लागू शकतो. कारण राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना यांच्या पराभवानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊ शकते.
...तर भाजपच्या अध्यक्षपदाची माळ?
या दणदणीत विजयाने फडणवीस यांचा आलेख गगनाला भिडला असून, त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. जर मुख्यमंत्रिपद शक्य झाले नाही, तर देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष असू शकतात.