सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 09:22 AM2024-12-02T09:22:37+5:302024-12-02T09:23:26+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: संख्याबळ पाहता भाजपाचे आमदार जास्त आहेत. एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणे आमच्या स्वभावात नाही असंही गोगावले यांनी मुख्यमंत्रिपदावरून सांगितले.
रायगड - मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितले होते, परंतु आम्ही सर्वांनी आग्रह केला. तुम्ही सत्तेबाहेर राहून नव्हे तर सत्तेत राहून काम करायचा असं विधान शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.
रायगड येथील पत्रकार परिषदेत गोगावले म्हणाले की, आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह केला. तेव्हा मला २ दिवस गावी जाऊन येऊ द्या, मला थोडं निवांत राहून विचारविनिमय करू द्यावा. आमच्या सगळ्यांचा आग्रह हा त्यांनी सत्तेत राहावा यासाठी आहे. उपमुख्यमंत्री कोण याबाबत आता काही सांगू शकत नाही. सर्वस्वी जबाबदारी आम्ही मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे. ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंद्य आहे. सत्तेच्या प्रक्रियेत साहेबांनी सहभागी व्हावं हेच आम्हाला वाटते असं त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा त्यांनी शपथविधी कधी ठेवायचे हे ठरवणं गरजेचे असते, विश्वासात न घेता शपथविधी घेतला जातोय हे म्हणणं बरोबर नाही. दिल्लीला बैठक झाली, तेव्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अमित शाह, जे.पी. नड्डा तिथे काही तरी ठरल्याशिवाय अशी तारीख दिली जाणार नाही. ५ डिसेंबरला शपथविधी करायचा आहे, त्याची तयारीही आझाद मैदानावर सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे सगळं होतंय, कुणाला बाहेर ठेवलं जातंय हे म्हणणं चुकीचे आहे असंही भरत गोगावले यांनी म्हटलं.
दरम्यान, जे होईल ते चांगले होईल, आमच्या तिन्ही पक्षात कुठेही कटुता नाही. चांगल्याप्रकारे सरकार स्थापन होईल. संख्याबळ पाहता भाजपाचे आमदार जास्त आहेत. एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणे आमच्या स्वभावात नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हसत हसत सांगितले, भाजपाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर माझा काही अडथळा नाही ते जाहीर केलंय, त्यामुळे नाराजीच्या चर्चेला अर्थ नाही. राजकारणात कधी काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही असंही भरत गोगावले यांनी सांगितले.