एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 06:23 AM2024-11-30T06:23:46+5:302024-11-30T06:24:45+5:30

अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलं नाही. नरेंद्र मोदी-अमित शाह निर्णय घेतील तेव्हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे कळेल असं शिरसाट यांनी सांगितले. 

Maharashtra Assembly Election Result 2024: Eknath Shinde will take "big decision" in next 24 hours, says Shiv Sena leader Sanjay Shirsat | एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरीही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. महायुतीला या निवडणुकीत भरघोस यश मिळाले त्यात १३२ जागा मिळवून भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. शिवसेनेला ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला. निकालानंतर मुख्यमंत्री कोण हा पेचप्रसंग निर्माण झाला असून भाजपा नेतृत्व देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेत आहे. मात्र यामुळे नाराज एकनाथ शिंदे शुक्रवारी महायुतीच्या बैठका रद्द करून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ दरे गावी पोहचले आहेत. त्यातच शिंदेंचे जवळचे सहकारी संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे हे जेव्हाही असा राजकीय पेचप्रसंग येतो किंवा त्यांना वाटतं आपल्याला विचार करायला वेळ हवा तेव्हा ते त्यांच्या गावाला प्राधान्य देतात. दरे गावात जातात, तिथे ना त्यांचा मोबाईल लागतो, ना संपर्क होतो, तिथे आरामात विचार करतात. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते दरे गावी गेलेले असतात. कदाचित ते आज गावी गेलेत. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत काही तरी मोठा निर्णय ते घेऊ शकतात. सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत त्यात काय करायला हवं, काय नाही याबाबत ते निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले.

तसेच अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली, त्यात काय निर्णय झाला हे अद्याप समोर आलं नाही. नरेंद्र मोदी-अमित शाह निर्णय घेतील तेव्हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे कळेल. एकदा मुख्यमंत्रिपदाचं नाव घोषित झाले तर त्यानंतर कोण मंत्री बनणार, मंत्रिमंडळ कसं असणार, किती मंत्रि‍पदे शिवसेनेला, किती राष्ट्रवादीला आणि किती भाजपाला मिळणार हे कळेल. पहिला प्रश्न मुख्यमंत्रि‍पदाचा आहे. २ डिसेंबरला शपथविधी सोहळा होईल अशी माहिती आहे. सध्या कुठलीही एकमेकांमध्ये चर्चा नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मोदी-शाहांना निर्णय घेण्यास सांगितले आहे. ते जो काही निर्णय घेतील ते इथं अंमलात आणलं जाईल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

दरम्यान, आमच्यात कुठलीही रस्सीखेच नाही. कोण मुख्यमंत्री होणार हा अजून निर्णय झालेला नाही. वरिष्ठ निर्णय घेतील त्याचे अंमलबजावणी इथं केली जाईल. एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार नाहीत, दिल्लीच्या राजकारणाऐवजी त्यांना महाराष्ट्रातील राजकारणात रस आहे. महाराष्ट्रात पक्षाचा जो पाया आहे तो मजबूत करण्याचं काम शिंदे करत आहेत. मंत्रिपद घ्यायचे की नाही याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील. हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदेंचा असेल असं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. 

जितेंद्र आव्हाडांनी घेतली शिंदेंची भेट

राज्यातील राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या. तासभर ही बैठक झाली. नेमकी कशासाठी ही भेट होती हे समोर आले नाही. या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या माध्यमांनी राजकीय वैमनस्याला वैयक्तिक संघर्षाचं चित्र दिले आहे. राजकीय विचारधारा वेगळी असते, त्यावर आम्ही लढत असतो. आम्ही काही चर्चा केली ते सांगायला हवं का, सरकार बनलं किंवा नाही याचं माझ्याशी काही देणेघेणं नाही. माझी मुलाखत ही वैयक्तिक आहे. मी सरकारमध्ये सामील होण्यासाठी गेलो नाही असं त्यांनी म्हटलं.  

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024: Eknath Shinde will take "big decision" in next 24 hours, says Shiv Sena leader Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.