"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 07:28 PM2024-11-24T19:28:19+5:302024-11-24T19:30:06+5:30
शरद पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचे सांगितले.
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही यंदा विविध घोषणांमुळे चर्चेची ठरली आहे. पंतप्रधान मोदींपासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या घोषणांवरुन विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जोरदार टीका केली होती. योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र अजित पवार आणि काही भाजप नेत्यांनीही याला विरोध केला होता. आता निकालानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी या घोषणेचा आपल्याला फटका बसला असल्याचे म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ८६ पैकी केवळ १० जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय मिळवता आला. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आम्हाला अपेक्षित होता असा निर्णय लागला नसल्याचे म्हटलं आहे. तसेच यावेळी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरूनही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
कराडमधल्या पत्रकार परिषदेरम्यान, शरद पवार यांना पत्रकारांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा फटका महाविकास आघाडीला बसला का? असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी बटेंगे तो कटेंगेचा फटका बसला असल्याची कबुली दिली आहे. "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिला. मात्र, त्या घोषणेमुळे निवडणुकीत मतांचं ध्रृवीकरणं नक्कीच झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन ज्याप्रकारे प्रचार करत होते, त्यामुळे निश्चितच फरक पडला”, असं शरद पवार यांनी म्हटलं.
"ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन बोलताना शरद पवार यांनी माहितीशिवाय बोलणार नसल्याचे म्हटलं आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.
आम्हाला असा अनुभव कधीच आला नाही - शरद पवार
"आमची जशी अपेक्षा होती तसा हा निकाल नाही. मात्र, शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. सध्या माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. त्यामुळे निकालाबाबत काही भाष्य करणं योग्य नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष आम्ही सामाजिक जीवनात आहोत. पण असा अनुभव आम्हाला कधी आला नव्हता. आता असा अनुभव आला आहे तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं.