राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:44 AM2024-12-04T10:44:30+5:302024-12-04T10:53:17+5:30

उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्‍यांसह अन्य मंत्र्‍यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

Maharashtra Assembly Election Result 2024: Mahayuti leaders will meet Governor C.P. Radhakrishnan and stake claim to form government | राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा

राजकीय हालचालींना वेग! महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा करणार दावा

मुंबई - गेल्या १० दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपाच्या विधिमंडळ आमदारांच्या बैठकीत नेता निवड प्रक्रिया पार पडली जाईल. त्यानंतर दुपारी साडे तीनच्या सुमारास महायुतीचे नेते राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. या भेटत राज्यपालांकडे महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यामुळे राज्यात पुढील ४८ तासांत नवीन सरकार स्थापन होणार आहे.

भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदाची घोषणा झाल्यानंतर तेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री असणार आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत १३२ जागा मिळवल्या आहेत. पहिल्यांदाच इतका मोठा विजय भाजपाने महाराष्ट्रात मिळवला आहे. त्यामुळे आज विधिमंडळ बैठकीसाठी विधानभवन फुलांनी सजवलं आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्र्‍यांसह अन्य मंत्र्‍यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला ७० हून अधिक व्हीव्हीआयपी नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, विशेष बाब म्हणजे, या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील ४०० हून अधिक साधू-संतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय, विविध समाजाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रणे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली  आहे. शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेल्या संतांमध्ये जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज, गोविंददेव गिरी महाराज, बागेश्वर बाबा, महामंडलेश स्वामी विश्वेश्वरानंद महाराज, जैन संत लोकेश मुनी, बंजारा संत, शीख संत, बौद्ध भिक्खू यांचा समावेश आहे. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी आणि महाकाल मंदिराचे मुख्य पुजारी, यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या मुख्य पुजाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024: Mahayuti leaders will meet Governor C.P. Radhakrishnan and stake claim to form government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.