"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:23 PM2024-11-24T18:23:13+5:302024-11-24T18:47:25+5:30
महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर होत असलेल्या आरोपांबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ८६ पैकी केवळ १० जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर ७६ ठिकाणी शरद पवार यांचे उमेदवार पराभूत झाले आहेत. या पराभवामुळे महाविकास आघाडीलाही मोठा फटका बसला आहे. या निकालानंतर आता २४ तासांनी शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर होत असलेल्या आरोपांबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ ४९ जागांपर्यंतच मजल मारता आली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक फटका हा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. विधानसभा निकालावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. एकीकडे मित्रपक्षांकडून ईव्हीएमवर आरोप होत असताना शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
"यावेळी दोन एक टक्क्यांनी महिलांचं मतदान वाढलं हे आताच्या आकडेवारी दिसून येतं. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली. त्यात आम्हाला थोडसा लोकांचा अधिक विश्वास वाटत होता. त्या अधिक विश्वासामुळे जेवढं आक्रमक रितीने प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती. मी राज्यात सर्व जिल्ह्यात फिरलो. तिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचेही उमेदवार होते. आमचा उमेदवार होता तिथे इतर पक्षाचे कार्यकर्ते राबत होते. सर्वांनी कष्ट केले. पण निकाल आमच्या विरोधात गेला," असं शरद पवार यांनी म्हटलं.
“ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. पण, पैशाचा वापर आतापर्यंत असा कधी पहायला मिळाला नव्हता. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात," असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.