Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:55 PM2024-11-23T16:55:46+5:302024-11-23T16:59:54+5:30

Vidhan Sabha Election Result 2024: तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू असं मी वचन देतो असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

Maharashtra Assembly Election Result 2024: Today election is not the end of my journey; MNS Amit Thackeray first reaction after defeat by Uddhav Thackeray Candidate Mahesh Sawant | Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई - माहीम मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांचा पराभव झाला असून या मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा ९४४ मतांनी विजय झाला आहे. या विजयानंतर अमित ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माहीम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे. आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलं.

अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं की, गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती. कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहीम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू असं मी वचन देतो असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

माहीम मतदारसंघातील तिरंगी लढतीत ठाकरे गटाचा विजय

माहीम मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात होते, तर मनसेने येथून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवलं. माहीममधून ठाकरे गट उमेदवार देणार की नाही अशी चर्चा सुरू होती. मात्र माहीम सेनेचा बालेकिल्ला असून आम्ही उमेदवार देणारच असं सांगत महेश सावंत यांना ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली. माहीममध्ये या तिरंगी लढतीत महेश सावंत यांचा ९४४ मतांनी विजय झाला. तर दुसऱ्या नंबरला सदा सरवणकर आणि तिसऱ्या नंबरवर अमित ठाकरे राहिले. महेश सावंत यांना ४७ हजार ३८१ मते, सदा सरवणकरांना ४६,४३७ मते तर अमित ठाकरे यांना अवघे ३१ हजार ६११ मते मिळाली आहेत. 

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024: Today election is not the end of my journey; MNS Amit Thackeray first reaction after defeat by Uddhav Thackeray Candidate Mahesh Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.