Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:28 PM2024-11-23T16:28:04+5:302024-11-23T16:32:17+5:30
Vidhan Sabha Election Result 2024: ठाण्यातील ओवळा माजिवडा येथे प्रताप सरनाईक आणि कोपरी पाचपाखाडी इथं एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत त्यामुळे इथेही ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहे. या निकालात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला आहे. त्यात आतापर्यंत भाजपाने १३२ तर शिवसेनेने ५५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं ४० जागांवर आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत कोकण विभागातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जवळपास ठाकरे गटाला हद्दपार केलं आहे. ठाकरे गटाला कोकणात केवळ १ जागा राखता आली आहे. बाकी सर्व ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.
कुडाळमधून निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव केला आहे तर रत्नागिरीत पुन्हा एकदा उदय सामंत यांनी त्यांची जागा राखली आहे. याठिकाणी भाजपातून ठाकरे गटात आलेले बाळा माने यांना सामंतांविरोधात उमेदवारी दिली होती. मात्र याठिकाणी बाळा माने यांचा पराभव झाला आहे. राजापूरमध्ये ठाकरे गटाचे राजन साळवी यांनाही पराभव सहन करावा लागला आहे. याठिकाणी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडून आले आहेत. सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर पुन्हा निवडून आले आहेत त्याठिकाणी ठाकरे गटाचे राजन तेली यांचा पराभव झाला आहे.
दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. याठिकाणी ठाकरे गटाच्या संजय कदम यांचा पराभव झाला आहे. गुहागर मतदारसंघात ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचा अवघ्या २५९२ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला कोकणात ही एकमेव जागा राखता आली आहे. याठिकाणी शिवसेनेच्या राजेश बेंडल यांचा पराभव झाला आहे. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांचा विजय झाला असून त्याठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत हे तिसऱ्या नंबरवर गेले आहेत. पालघर मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांचा ४० हजार मतांनी विजय झाला आहे. तिथे ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांचा पराभव झाला आहे.
अंबरनाथ मतदारसंघात डॉ. बालाजी किणीकर हे पुन्हा निवडून आले आहेत. त्याठिकाणी ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांचा ३५ हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला आहे. बोईसर मतदारसंघात शिवसेनेचे विलास तरे निवडून आले आहेत. तिथे ठाकरे गटाचे उमेदवार विश्वास वाळवी हे तिसऱ्या नंबरवर आहेत. भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शांताराम मोरे हेही पुन्हा विजयी झाले आहेत. त्याठिकाणी ठाकरे गटाचे महादेव घटाळ यांचा ५७ हजार मतांनी पराभव झाला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजेश मोरे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत तिथे ठाकरे गटाचे सुभाष भोईर हे तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. कल्याण पश्चिम येथेही शिवसेनेचे विश्ननाथ भोईर पुन्हा विजयी झाले आहेत तिथे ठाकरे गटाचे सचिन बासरे यांचा पराभव झाला आहे. ठाण्यातील ओवळा माजिवडा येथे प्रताप सरनाईक आणि कोपरी पाचपाखाडी इथं एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत त्यामुळे इथेही ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.