मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:56 PM2024-11-28T14:56:33+5:302024-11-28T14:57:07+5:30
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स अजून कायम आहे. आज शिंदे, फडणवीस आणि पवारांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे.
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांच्या नजरा नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाकडे लागल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वतःला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले असून, भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, जोपर्यंत भाजप हायकमांड याची घोषणा करत नाही, तोपर्यंत फडणवीसांच्या नावावरही सस्पेन्स कायम असेल.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावावरील सस्पेन्स पुन्हा वाढला आहे. याचे कारण म्हणजे, गेल्या काही काळापासून पीएम मोदी आणि शाह त्यांच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का देत आहेत. सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच यावरचा पडदा हटणार आहे. महायुतीतील तिन्ही पक्षातील समन्वय आणि सलोखा टिकवून ठेवण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत आहे.
राजकीय कोंडी?
शिंदे-फडणवीस आणि अजितदादा आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असून, तिथे अमित शाहांची भेट घेणार आहेत. या बैठकीपूर्वी विनोद तावडे आणि शाहांची एक बैठक झाली, ज्यात तावडेंनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि नवीन सरकार स्थापनेच्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. शिंदे मुख्यमंत्री न झाल्याचा राज्यातील राजकीय समीकरण आणि महाराष्ट्रातील मराठा मतदारांवर होणाऱ्या परिणामाबाबत मत व्यक्त केले. शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीपूर्वी अमित शाहा महाराष्ट्रातील नेत्यांकडून सातत्याने अभिप्राय घेत आहेत आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने राजकीय फायदा-तोट्याचे आकलन करत आहेत.
राज्यात मराठा मतदार महत्त्वाचा
देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातील आहेत, तर एकनाथ शिंदे मराठा समाजातील आहेत. महाराष्ट्रात मराठा मतदार खूप महत्त्वाचा आणि निर्णायक आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णय भाजपच्या कोर्टात ठेवला असून मी पंतप्रधान मोदी-अमित शाहांच्या निर्णयाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. शिंदें या वक्तव्यानंतरच भाजपला अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. मात्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास मराठ्यांची नाराजी होण्याची भीती आहे. अशा स्थितीत भाजप कोणते राजकीय समीकरण तयार करते, हे पाहणे महत्वाचे असेल.
ओबीसी भाजपचा राजकीय आधार
महाराष्ट्रात भाजपचा राजकीय पाया ओबीसी आहे. महाराष्ट्रात भाजप सुरुवातीपासून ओबीसी मतांच्या जोरावर राजकारण करत आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भाजपच्या ओबीसी नेत्यांची नाराजी समोर आली होती. त्यामुळे मराठासोबत ओबीसी मतांचाही विचार भाजपला करावा लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी भाजप सर्व समीकरणांची पडताळणी करुन पाहत आहे. अशा सर्व स्थितीत भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नावावर विश्वास व्यक्त करणार की, नव्या नावाची घोषणा करून सरप्राईज देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.