एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:41 AM2024-10-19T11:41:16+5:302024-10-19T11:41:16+5:30

अंतर्गत वाद, दावेदारीही विलंबाचे कारण; मनोज जरांगे पाटील काय करणार याकडेही सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष

Maharashtra assembly election Waiting for each other, everyone's candidate lists got long, internal disputes, rivalry also caused the delay | एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची

एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची

मुंबई : महायुतीमहाविकास आघाडी एकमेकांचे उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहत असल्याने आणि त्याचवेळी दोघांचाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने सगळ्यांच्याच उमेदवार याद्या अडल्या आहेत. 

उमेदवारी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आतापासून उमेदवार जाहीर केले, तर बंडखोरी होईल, अशी भीती सगळ्याच मोठ्या पक्षांना वाटत आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याची घाई कशाला, असा विचार करून सगळेच पक्ष थांबले आहेत.  

महायुती व मविआमध्ये किमान ३० मतदारसंघ असे आहेत की, जिथे पहिले समोरच्यांनी उमेदवारी जाहीर करण्याची वाट पाहिली जात आहे. उमेदवारी नाकारल्याने आपल्याकडचे इच्छुक दुसरीकडे जातील, अशी शंका महायुती व मविआ या दोघांनाही वाटत आहे. त्यामुळेच उमेदवार जाहीर करण्याचे लांबणीवर टाकले जात आहे.  

जरांगेंच्या भूमिकेवर समीकरणे अवलंबून 
- मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील हे कोणता निर्णय २० ऑक्टोबरला घेतात, हे बघूनही काही मतदारसंघातील उमेदवार महायुती आणि महाविकास आघाडी ठरवेल, असे म्हटले जात आहे. 
- जरांगे पाटील स्वत: उमेदवार लढवतील की, कोणाला पाठिंबा जाहीर करतील, याबाबत उत्सुकता आहे. त्यांच्या भूमिकेवर किमान ६०-७० विधानसभा मतदारसंघांतील समीकरणे अवलंबून असतील, असे मानले जात आहे.
- त्यामुळेही महायुती व मविआ उमेदवार जाहीर करण्याची घाई करत नसल्याचे चित्र आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात जरांगे पाटील फॅक्टर महत्त्वाचा असेल. 

भाजपची पहिली यादी दोन दिवसांत? 
भाजपमध्ये दोन डझन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे.

ही रणनीती अंमलात आणण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आली आहे. त्यातील बहुतेकांनी उमेदवार यादी जाहीर करण्याची घाई करू नका, असे मत दिले आहे.

भाजपची पहिली यादी गुरुवारीच जाहीर केली जाणार होती, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ती अडली आहे. तरीही, आमची पहिली यादी दोन दिवसांत येईल, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला.
 

Web Title: Maharashtra assembly election Waiting for each other, everyone's candidate lists got long, internal disputes, rivalry also caused the delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.