औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 03:19 PM2019-12-02T15:19:08+5:302019-12-02T15:23:53+5:30
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 9 जागांपैकी 6 ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहे.
- मोसीन शेख
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी झाल्यांनतर आता लक्ष मंत्री मंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे. तर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादमध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पाडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असेलल्या संदीपान भुमरे, संजय शिरसाठ की नव्याने पक्षात आलेले अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळणार याची चर्चा जिल्हाभर पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 9 जागांपैकी 6 ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहे. त्यामुळे मंत्रीपदावर औरंगाबाद जिल्ह्याचा नैसर्गिक दावा असल्याचा शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारात कुणाचा नंबर लागणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामध्ये पाचव्यांदा पैठण मतदार संघातून शिवसेनेकडून निवडून येणारे संदीपान भुमरे, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून हॅटट्रिक करणारे संजय शिरसाठ आणि नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांचे नाव चर्चेत आहे.
मात्र असे असले तरीही जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये पुन्हा निष्ठावंत विरोधात आयाराम अशी चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्यावेळी भाजप-शिवसेनेचं सरकार असताना जून महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शिवसेनेच्या मराठवाड्याच्या आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना लगेच मंत्रीपद मिळतात, मग आम्ही काय करावं ? अशी नाराजी या आमदारांमध्ये होती.
आता पुन्हा नुकतेच शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याने जुन्या आणि निष्ठावंत नेत्यांच्या गोटात नाराजी पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा हात सोडल्यानंतर सत्तार यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी हालचाली केल्या होत्या. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध होत असल्याने त्यांना शिवसेनेवेतिरिक्त पर्याय नव्हता. त्यामुळे नुकतेच पक्षात आलेल्या लोकांना मंत्रीपद देऊन जुन्यांना डावलले गेल्यास पक्षातील पक्षात दोन गट निर्माण होण्याची शक्यता जिल्ह्यातील जुन्या नेत्याकडून वर्तवण्यात येत आहे.